घरासमोर उभी असलेली दुचाकी लंपास ; जुना गोंडेगाव परिसरातील घटना
कन्हान : कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना गोंडेगाव येथील करुणा बौद्ध विहार परिसरातून घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुहास लालाजी गजभीये (वय ४१, रा. करुणा बौद्ध विहार समोर, जुना गोंडेगाव) हे मंगळवार (दि. २३ जून) रोजी त्यांच्या हिरो स्प्लेंडर प्लस (क्र. एमएच-४०-एएच-२५७९) या दुचाकीने बाहेर गेले होते. सायंकाळी सुमारे ५.३० वाजता घरी परतल्यानंतर त्यांनी वाहन घरासमोरील अंगणात उभी केली. रात्री ११ वाजता बाहेर येऊन पाहिले असता वाहन जागेवरच होते. मात्र, दुसऱ्या दिवशी बुधवार (दि. २४ जून) रोजी सकाळी ५ वाजता उठून अंगणात पाहिले असता दुचाकी जागेवर नव्हती. परिसरात सर्वत्र शोध घेतल्यानंतरही वाहनाचा कोणताही मागमूस लागला नाही.
मंगळवार रात्री ११ ते बुधवार सकाळी ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी सुमारे ८ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सुहास गजभीये यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या