कांद्रीत ११ वर्षीय मुलाला ११ हजार व्होल्ट विद्युत तारेचा करंट
11,000-Volt Electric Shock Hits 11-Year-Old Boy in Kandri
थोडक्यात बचावला ; महावितरण व नगर पंचायत प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप
कन्हान : - कांद्री नगर पंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक ६ मधील वेकोलिच्या मागील परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेत ११ वर्षीय मुलाला ११ हजार व्होल्टेजच्या विद्युत तारेचा करंट लागून तो गंभीर जखमी झाला . स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि वेळीच उपचार मिळाल्याने मुलाचा जीव थोडक्यात बचावला असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे . या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महावितरण विभाग आणि नगर पंचायत प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त करत निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे .
प्राप्त माहितीनुसार, सोमवार (दि.११) मे रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास नितीन नरेंद्र सूर्यवंशी हा आपल्या चुलत भावांसोबत खेळत होता. त्याच्यासोबत अंकित बिरन सूर्यवंशी आणि अजित श्याम सूर्यवंशी हे देखील उपस्थित होते . खेळता-खेळता नितीनचा हात अचानक खाली झुकलेल्या विद्युत तारेस लागला आणि तो तारेला चिकटला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिवकुमार धुर्वे यांनी प्रसंगावधान राखत काठीच्या साहाय्याने मुलाला तारांपासून दूर केले .
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील कांचन मस्के , पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले . जखमी मुलाला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे दाखल करण्यात आले . प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी मेयो रुग्णालय नागपूर येथे रेफर केले . घटनेची माहिती मिळताच रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या .
“वेळीच उपाययोजना केली असती तर घटना टळली असती”
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महावितरण विभागावर गंभीर आरोप केले . वेकोलिच्या सततच्या डंपिंगमुळे परिसरात मातीचे ढिगारे वाढले असून त्यामुळे ११ हजार व्होल्टेजच्या विद्युत तारा धोकादायकरीत्या खाली झुकल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे . काही दिवसांपूर्वी जोरदार वाऱ्यामुळे विद्युत पोल कोसळले होते . याबाबत वारंवार तक्रारी व पत्रव्यवहार करूनही महावितरण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला .
नागरिकांच्या मते , “प्रशासनाने वेळेत उपाययोजना केली असती तर आज एका निष्पाप मुलाचा जीव धोक्यात आला नसता .” या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खेळाच्या मैदानाअभावी मुलांचे जीव धोक्यात
कांद्री परिसरात अनेक वर्षांपासून मुलांसाठी सुरक्षित खेळाचे मैदान नसल्याने मुले धोकादायक जागी खेळण्यास मजबूर असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे . या संदर्भात १२ फेब्रुवारी रोजी नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाला निवेदन देऊन अतिक्रमण हटवून मैदान, बाजार व्यवस्था आणि पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली होती . मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याचा आरोप करण्यात आला . घटनेनंतर नागरिकांनी सुजित पानतावणे यांच्या नेतृत्वातील नगर पंचायत प्रशासन आणि महावितरण विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली . तसेच जखमी मुलाला तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे .
दरम्यान, महावितरण विभागाचे अधिकारी श्रीवास्तव यांनी घटनास्थळी भेट देऊन योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले. मात्र संतप्त नागरिकांनी “आश्वासन नको, कायमस्वरूपी उपाय हवा,” अशी ठाम भूमिका घेत प्रशासनाला तातडीने समस्या सोडविण्याचा इशारा दिला आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या