Advertisement

पारशिवणी येथे डिजिटल सेवा केंद्रात चोरी; ३० हजारांची रोख रक्कम लंपास


पारशिवणी येथे डिजिटल सेवा केंद्रात चोरी; ३० हजारांची रोख रक्कम लंपास

पारशिवणी येथे डिजिटल सेवा केंद्रात चोरी; दोन अल्पवयीन मुलांवर संशय

पारशिवणी: पारशिवणी येथील 'राकेश डिजिटल सेवा केंद्रा'मध्ये चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, दुकानातील गल्ल्यातून ३०,००० रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. याप्रकरणी पारशिवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार राकेश प्रमोद भाणुसमरे यांचे शिवटेकडी परिसरात 'राकेश डिजिटल सेवा केंद्र' आहे. १३ जुलै २०२६ रोजी दिवसभराचे कामकाज आटोपल्यानंतर, त्यांनी जमा झालेली ३०,००० रुपयांची रोख रक्कम दुकानाच्या गल्ल्यात ठेवून रात्री ९:०० वाजता दुकान बंद केले होते.

दुसऱ्या दिवशी, १४ जुलै २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता राकेश जेव्हा दुकानात पोहोचले, तेव्हा त्यांना दुकानाच्या बाजूचे टिनचे पत्रे काढलेले दिसून आले. दुकानाचे बांधकाम सुरू असल्याने चोरट्यांनी याचा फायदा घेत आत प्रवेश केला होता. आत जाऊन पाहिले असता, गल्ल्यातील ३०,००० रुपये गायब असल्याचे त्यांना आढळले. तसेच, काही ५०० रुपयांच्या नोटा जमिनीवर व काउंटरवर विखुरलेल्या अवस्थेत दिसून आल्या.

राकेश यांनी त्वरित दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक लहान मुलगा गल्ल्यातून पैसे काढताना दिसून आला. यानंतर राकेश यांनी अधिक चौकशी केली असता, त्यांच्या घराच्या मागे राहणाऱ्या पूजा कामडे यांची दोन मुले, ओम कामडे आणि युवराज कामडे, यांनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पीडित दुकानदाराने पारशिवणी पोलिसांकडे योग्य कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

प्रतिनिधी: पुनादास गजभिये, पारशिवणी



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या