कन्हानमध्ये भाजीपाला विक्रेत्या महिलेच्या दुकानाला संशयास्पद आग
१५ हजारांचे नुकसान , आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
३५ वर्षांपासून उदरनिर्वाहाचे साधन असलेले दुकान जाळल्याचा आरोप ; जागेच्या वादातून कट रचल्याचा संशय
कन्हान : - कन्हान शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयासमोर मागील ३५ वर्षांपासून भाजीपाला विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका ६० वर्षीय महिलेच्या दुकानाला मध्यरात्री संशयास्पदरीत्या आग लावण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दुकानातील भाजीपाला विक्रीचे साहित्य जळून खाक झाले असून सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी एका संशयित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
तक्रारदार निमला सोमा चौधरी (वय ६०), रा.धरमनगर, पिपरी-कन्हान या सरकारी रुग्णालयासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ लगत मागील ३५ वर्षांपासून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्तींना त्यांचे दुकान त्या ठिकाणी असणे मान्य नाही आहे. दुकान हटविण्याच्या उद्देशाने वारंवार त्रास देण्यात येत आहे. दुकानासमोर विटा, माती टाकणे, जागा बदलण्यास भाग पाडणे अशा प्रकारांमुळे मानसिक त्रास देणे सुरु असुन यापूर्वीही त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते.
तक्रारीनुसार, निमला चौधरी शुक्रवार (दि.१७) जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता दुकान बंद करून त्या घरी गेल्या. त्यानंतर शनिवार (दि.१८) जुलै रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजता कन्हान पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर दुकानाचे कुलूप तुटलेले असून दुकानातील केरेट, पाल व इतर साहित्य जळालेल्या अवस्थेत आढळले. या आगीत अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारदार महिलेने शिव प्रदीप जाधव (रा.स्वामी विवेकानंद नगर, कन्हान) यांच्यावर जागेच्या वादातून यापूर्वीही दुकानाचे नुकसान केल्याचा आरोप करत, याच व्यक्तीने दुकानाला आग लावल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी निमला चौधरी यांचा तक्रारी वरून संशयित आरोपी शिव जाधव विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
दरम्यान, एका गरीब महिलेच्या उदरनिर्वाहाचे साधनच उद्ध्वस्त करणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी तसेच पीडित महिलेला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या