कन्हान शहरापर्यंत नागपूर मेट्रोचा विस्तार; टप्पा-२ ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय; ३१०.३१ कोटींचा प्रकल्प
कन्हान : - नागपूर मेट्रो रेल्वेच्या टप्पा-२ अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहरादरम्यान उन्नत (Elevated) मेट्रो मार्गिका उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील विधान भवनात झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या विस्तारामुळे कन्हान परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम, जलद आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून, नागपूर महानगराशी कन्हानची जोडणी अधिक मजबूत होणार आहे. प्रस्तावित मेट्रो मार्गिका १.४० किलोमीटर लांबीची असून, त्यावर एक उन्नत मेट्रो स्थानक उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत ३१०.३१ कोटी रुपये असून, प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) मार्फत केली जाणार आहे. केंद्र शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या निर्णयामुळे कन्हान परिसरातील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळण्यासोबतच औद्योगिक, व्यावसायिक आणि नागरी विकासालाही मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या