श्री संताजी अखिल तेली समाज संघटन वाडी शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
समाज विकासासाठी एकत्रित कार्य आवश्यक – पुरुषोत्तम रागीट
अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न करा – प्राचार्य सुभाष खाकसे
नागपूर : - श्री संताजी अखिल तेली समाज संघटन, वाडी शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. २८ जून) दत्तवाडी, मारुतीनगर येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक गोविंद रोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नरेश चरडे, वाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सानप, नगरसेवक केशव बांद्रे, नगरसेविका रेखा रोडे, डॉ. देवेंद्र कैकाडे, पुरुषोत्तम लिचडे, डॉ. प्रभाकर थोराणे, दीपक अवचट, कांचन माकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी दहावी, बारावी तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघटनेला सातत्याने सहकार्य व मार्गदर्शन करणारे समाजसेवक व शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य सुभाष खाकसे, शिक्षक नेते अरुण कराळे आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी लोकपाल चापले यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
शैक्षणिक मार्गदर्शन करतांना प्राचार्य सुभाष खाकसे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात योग्य नियोजन, पालकांशी सकारात्मक संवाद, अपयशानंतर खचून न जाता नव्या जोमाने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. शिक्षणासोबत किमान एक कौशल्य आत्मसात करून निश्चित ध्येय ठेवावे तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नगराध्यक्ष नरेश चरडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. तसेच वाडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच अत्याधुनिक ग्रंथालय उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सानप यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ समाजसेवक पुरुषोत्तम रागीट यांनी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत यश संपादन करून समाज व देशाचे नाव उंचवावे, तसेच समाजाच्या विकासासाठी व विविध समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात उद्योजक गोविंद रोडे यांनी अशा सत्कार कार्यक्रमांमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नवचैतन्य निर्माण होत असल्याचे सांगितले. यशस्वी झाल्यानंतर समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रास्ताविकात संघटनेचे संस्थापक व राज्याध्यक्ष अनिल बजाईत यांनी वर्षभरात संघटनेतर्फे राबविण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचा तसेच विविध नागरी समस्यांच्या निराकरणासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावा घेत समाजबांधवांनी संघटनेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकपाल चापले यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश साहू यांनी केले.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोतीराम शहारे, अशोक साहू, वासुदेव लिचडे, संजय जीवनकर, मनोज भुरे, सचिन लिचडे, अनिल दहाघाणे, हरपाल साहू, उमेश साहू, विजय शिदुरकर, सूर्यभान चकोले, सोनू चुटे, वैशाली दहाघाणे, कान्होपात्रा रोडे, कमलाकर पाटील, योगेश शहारे, ओमदेव लांबट, अमित साखरकर, मंगेश येनुस्कर, सुनील सरोदे, ऋषभ बावनकर, ज्ञानेश्वर वंजारी, सुनील बजाईत, रोशन कावडकर, नितेश झाडे, योगेश लांजेवार, प्रभाकर लाकडे, प्रितम गायधने, मधुकर कुल्हरकर यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या