गॅस वितरकाच्या भोंगळ कारभारामुळे कन्हान मध्ये भीषण आग ; वेळेत सिलिंडर न बदलल्याने मोठी दुर्घटना
दोन-तीन दिवसांच्या गॅस गळतीकडे दुर्लक्ष ; नगराध्यक्ष व नागरिकांच्या प्रसंगावधानाने टळली जीवितहानी , दोषींवर कारवाईची मागणी
कन्हान : - कन्हान शहरातील स्वामी विवेकानंद नगर येथे सोमवारी (दि.६) सकाळी गॅस सिलिंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या भीषण आगीने गॅस वितरण व्यवस्थेतील निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड केला आहे. संबंधित गॅस वितरकाने ग्राहकाच्या वारंवार तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा गंभीर आरोप चवरे कुटुंबीयांनी केला असून, या भोंगळ कारभारामुळे एका कुटुंबाचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त होण्याची वेळ आली.
आनंद फजित चवरे यांच्या घरी सकाळी सुमारे ७.१५ वाजताच्या सुमारास गॅस गळतीमुळे अचानक आग भडकली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे आणि नगरसेवक हरीश तिडके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दल येण्यापूर्वीच त्यांनी अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनीही रेती, पाणी, ओले कंबल आदींच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर जळत असलेला सिलिंडर घराबाहेर काढण्यात आला. त्यानंतर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले.
चवरे कुटुंबीयांनी सांगितले की, संबंधित सिलिंडरमधून मागील दोन ते तीन दिवसांपासून गॅस गळती होत होती. याबाबत गॅस वितरकाकडे वारंवार तोंडी तक्रार करून सिलिंडर बदलून देण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, वितरकाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. वेळेत दोषपूर्ण सिलिंडर बदलून दिला असता तर ही भीषण दुर्घटना टळली असती, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या घटनेमुळे गॅस वितरणातील निष्काळजीपणा, ग्राहकांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष आणि सुरक्षेच्या नियमांची होत असलेली पायमल्ली समोर आली आहे. ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा निष्काळजी गॅस वितरकांवर कठोर कारवाई करावी, संबंधित सिलिंडरची तांत्रिक तपासणी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा तसेच चवरे कुटुंबाला झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या