कन्हानला प्रवासी निवारा कधी? मूलभूत सुविधांच्या अभावावर सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
रैन बसेरा, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी व प्रवासी सुविधा तातडीने उभारण्याची मागणी
सामाजिक कार्यकर्त्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
कन्हान : - कन्हान - पिपरी नगरपरिषद हद्दीत दररोज हजारो नागरिक, ग्रामीण भागातील रुग्ण, विद्यार्थी, कामगार आणि इतर प्रवासी विविध कामानिमित्त ये-जा करतात. मात्र शहरात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी सुरक्षित निवारा, स्वच्छ प्रसाधनगृह, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विश्रांतीसाठी जागा यांसारख्या अत्यावश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने कन्हान-पिपरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनात शहरात तातडीने शासकीय प्रवासी निवारा (रैन बसेरा) उभारण्याची मागणी करण्यात आली. या निवाऱ्यामध्ये स्वच्छ प्रसाधनगृह, शुद्ध पिण्याचे पाणी, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा, बसण्याची व विश्रांतीची व्यवस्था, प्रकाशयोजना आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, एखाद्या शहराच्या विकासाचे मोजमाप केवळ रस्ते किंवा इमारतींवर होत नसून नागरिक व प्रवाशांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांवरही होते. कन्हानसारख्या वाढत्या शहरात आजही प्रवाशांसाठी साधा निवाराही उपलब्ध नसणे ही प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. शहराचा सर्वांगीण व लोकाभिमुख विकास साधायचा असेल तर अशा जनहिताच्या सुविधा उभारणे अत्यावश्यक आहे.
कार्यकर्त्यांनी या सुविधांचा वापर करणाऱ्या प्रवाशांकडून नाममात्र शुल्क आकारण्याचाही प्रस्ताव मांडला. त्यामुळे सुविधांची नियमित देखभाल होण्यास मदत होईल, नगरपरिषदेच्या उत्पन्नात भर पडेल आणि प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ व सन्मानजनक सुविधा मिळतील, असे त्यांनी सांगितले.
मुख्याधिकाऱ्यांसमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी ही मागणी ठामपणे मांडत प्रशासनाने याकडे केवळ आश्वासनापुरते न पाहता तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कन्हान शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनहितासाठी प्रवासी निवारा व मूलभूत सुविधा उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार, नितीन मेश्राम आणि संजय चव्हाण उपस्थित होते.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या