कन्हान पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; घरफोडीच्या ५ गुन्ह्यांचा पर्दाफाश
तीन आरोपी ताब्यात, दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत
कन्हान : - कन्हान शहर व परिसरात वाढत्या घरफोडी आणि चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यात कन्हान पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अत्यंत कुशल तपास, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे कन्हान पोलिसांनी घरफोडीचे तब्बल पाच गुन्हे उघडकीस आणत एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, सुमारे दीड लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तपासादरम्यान उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये टेकाडी येथील नंदकिशोर लेकुरवाडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून २० हजार रुपयांचा ऐवज चोरी करण्यात आला होता. तसेच वाघधरे वाडी येथील अमर शेंडे हे कुटुंबासह गोंदिया येथे गेले असताना त्यांच्या घरातून सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ४६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याशिवाय न्यू गोंडेगाव येथील किशोर ज्वेलर्स दुकानाचे शटर तोडून सुमारे ७० हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरी करण्यात आले होते. तसेच गणेशनगर येथील दीपक पॉलिश सेंटर ज्वेलर्स येथे ही शटर फोडून सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता.
या सर्व प्रकरणांमध्ये कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी आरोपी गौरव उर्फ तेलानी राजू राऊत (वय २१)रा. अशोकनगर, कन्हान व त्याचा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालक हे रेल्वेने डोंगरगडच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कन्हान पोलिसांच्या डी.बी. पथकाने कामठी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. गौरव राऊत याला न्यायालयीन परवानगीनंतर पोलीस कोठडी मिळाली असून, विधीसंघर्षग्रस्त बालकास बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.
या गुन्ह्यातील तिसरा आरोपी साहिल किशोर लांजेवार (वय २०) रा. बुद्धनगर, जरीपटका, नागपूर हा फरार होता. तो खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचोली परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यालाही ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपींनी कन्हान परिसरातील चार आणि कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरीतील सोने-चांदीचे दागिने आणि इतर साहित्य असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांनी नागपूर शहर व वर्धा जिल्ह्यातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के आणि कन्हान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत सपोनि गिरीधर पेंदोर, पोहवा हरिष सोनमद्रे, अमित यादव, पो.ना. अनिल यादव, पो.शि. आकाश सिरसाट, अश्विन गजमिये, जीवन विधे, मपोहवा विना थुल, चापोशि राहुल यादव तसेच सायबर पोहवा सतीश राठोड यांनी मोलाची भूमिका बजावली.
कन्हान परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांवर प्रभावी अंकुश ठेवत अल्पावधीत गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या कन्हान पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांकडून सर्वत्र स्वागत होत असून, त्यांच्या तत्परता, व्यावसायिकता आणि कार्यक्षमतेबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या