सत्रापूर लेबर कॅम्पवर कन्हान पोलिसांची धाड ; १० दुचाकींसह ४.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
अवैध जुगार अड्डा उद्ध्वस्त , सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा सत्रापूर येथील लेबर कॅम्प येथे सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलीसांनी धाड टाकून सुरू असलेला अवैध जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत सहा जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून १० दुचाकी, चार मोबाईल फोन, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ४ लाख २० हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. २२ जुलै) रोजी कन्हान पोलीस परिसरात गस्त घालत असताना सत्रापूर येथील लेबर कॅम्पमध्ये काही व्यक्ती ५२ पत्त्यांवर पैशांची हार-जीत लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी धाड टाकली.
कारवाई दरम्यान देवानंद शामराव कुरमनकर (२७, रा. बोरडा) निरज राकेश तिवारी (३४, रा. पिपरी, कन्हान), मोहन महादेव शिवणकर (२९, रा. पिपरी, कन्हान), कशीस कमल खडसे (२३, रा. सत्रापूर), निहाल मोरेश्वर मेश्राम (२४, रा. नया गोदाम, कामठी) आणि सारंग कार्तिक कुथे यांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले.
घटनास्थळावरून पोलिसांनी १० दुचाकी वाहन, चार मोबाईल फोन, रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरलेले साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख २० हजार ३८० रुपये इतकी असून, आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहेत.
ही कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पोउपनि मरकट, पोहवा नरेश बाटबरई, पोना अनिल यादव, पोशि आकाश सिरसाट, नवीन पाटील, जीवन विधे आणि राहुल जाधव यांनी सक्रिय सहभाग घेतला.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या