गोंडेगाव (जुनी वस्ती) धोक्याच्या छायेत ; नागरिकांचे पुनर्वसन व वाढीव भरपाईची मागणी
वेकोलि खाणकामामुळे घरांना तडे, जमिनीला भेगा ; पुनर्वसन होईपर्यंत कारवाई नको, अन्यथा जीवितहानीस प्रशासनच जबाबदार
कन्हान : - पारशिवनी तालुक्यातील मौजा गोंडेगाव (जुनी वस्ती) येथील धोकादायक घोषित परिसरातील नागरिकांनी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोलि), जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच संबंधित प्रशासनाला निवेदन सादर करून तातडीने पुनर्वसन, वाढीव भरपाई आणि प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याप्रकरणी त्वरित निर्णय न घेतल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही जीवित व वित्तहानीस प्रशासन आणि वेकोलि जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वेकोलिच्या खाणकामामुळे संपूर्ण परिसरात जमिनीला मोठमोठे तडे गेले असून अनेक घरांमध्ये भेगा पडल्या आहेत. रस्ते खचत असून परिसरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन परिसर धोकादायक घोषित करण्यात आला असला, तरी अद्यापही पुनर्वसनाची ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
निवेदनात विभागीय आयुक्तांनी २५ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या पुनर्सर्वेक्षणाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच 'जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रक्रियेत न्याय्य भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार अधिनियम, २०१३' अंतर्गत वाढीव भरपाई मंजूर करावी, पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नागरिकांवर कोणत्याही प्रकारची दडपशाही अथवा फौजदारी कारवाई करू नये, अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली आहे.
याशिवाय १९९३-९४ मध्ये अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीच्या बदल्यात पात्र शेतकऱ्यांना कायमस्वरूपी रोजगार अथवा एकरकमी आर्थिक पॅकेज देण्यात यावे, पुनर्वसनस्थळी रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आदी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, उर्वरित संपादित न झालेली शेती जमीन अधिग्रहित करावी तसेच सर्व पात्र प्रकल्पग्रस्तांना रोजगार व पुनर्वसनाचे लाभ तातडीने मंजूर करावेत, अशा मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर प्रणय ईश्वर खवले, पंजाब लांजेवार, रविंद्र पाहाडे, गुलाब राऊत, सेवक राऊत, नरेश शेंडे, अमित नागदेवे, प्रभुदास गजभिये, संदेश लांजेवार, प्रशांत चौधरी, दशरथ मोहन ठाकरे, संजय रासेगावकर, सुरेश हुकुम, कृपाविलास गजभिये, नरेश नाईक, रमेश नेवारे, बंडू वाघाडे, सिताराम राऊत, गणेश मोहुर्ले, अमरदीप गजभिये, मनोज गोंडाने, सोनू कनोजिया, देवकला मेश्राम, अर्चना गजभिये, वंदना गोळंगे, सुनिता नेवारे, प्रमिला रासेगावकर, कुसुम गजभिये, सुशिला सहारे, सुप्रिया मेश्राम, नर्मदा सोमकुवर यांच्यासह गोडेगाव (जुनी वस्ती) येथील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नागरिकांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, धोकादायक परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळणे तात्काळ थांबवून पुनर्वसनाची प्रक्रिया युद्धपातळीवर राबवावी. अन्यथा भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वेकोलि आणि संबंधित प्रशासनाची राहील, असा ईशारा नागरिकांनी दिला आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या