Advertisement

कन्हानमध्ये औषधांचा नावाखाली नशेचा व्यापार उघड

कन्हानमध्ये औषधांचा नावाखाली नशेचा व्यापार उघड


नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या टॅब्लेटचा मोठा साठा सह ३.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त


आरोपी जेरबंद ; एनडीपीएस पथक व कन्हान पोलिसांची धडाकेबाज कामगिरी


कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत काली माता मंदिरासमोर, कामठी कॉलरी नंबर ३, खदान येथे एनडीपीएस पथक आणि कन्हान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत Tramadol HCI (Psychotropic) औषधयुक्त कॅप्सूलचा विनापरवाना साठा करून त्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत ३ लाख ६३ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला पोलिसांनी जोरदार चाप बसविला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.२१) जुलै रोजी एनडीपीएस पथक आणि कन्हान पोलिस विभागाचे अधिकारी कन्हान उपविभागात गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि शोराब जब्बार अन्सारी (वय ४५), रा. काली माता मंदिरासमोर, कामठी कॉलरी नंबर ३, खदान कन्हान, हा आपल्या राहत्या घरी Pyeevon Spas Plus या ब्रँडच्या Tramadol HCI असलेल्या कॅप्सूलचा मोठा साठा करून त्यांची अमली पदार्थ म्हणून बेकायदेशीर विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.


सदरची माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस पथक, कन्हान पोलीस आणि औषध निरीक्षक यांनी संयुक्तपणे सापळा रचून आरोपीच्या घरावर धाड टाकली. पंचांसमक्ष घेण्यात आलेल्या झडतीदरम्यान आरोपीकडून Tramadol HCI असलेल्या Pyeevon Spas Plus या एकूण १५,८१४ कॅप्सूल (एकूण वजन ७.९०७ कि.ग्रॅ.), ज्यांची किंमत १ लाख ५८ हजार १४० रुपये, रोख २९ हजार ३८० रुपये, दोन मोबाईल हँडसेट आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ३ लाख ६३ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


या प्रकरणी कन्हान पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध  एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या रॅकेटमागील इतर आरोपी, पुरवठादार व साखळीचा शोध घेण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत.


सदरची कारवाई नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, कन्हान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड‌, यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि अजितसिंग देवरे, पोउपनि प्रवीण भिमटे, पोहवा प्रवीण देव्हारे, प्रकाश ठोके, अमोल नागरे, अविनाश तोडसाम आणि पोशि अनिल खरडकेले यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या