आंगनवाडी सेविकांना पेन्शन व ग्रॅच्युइटी लागू करा ; कन्हानच्या महिला मेळाव्यात एकमुखी मागणी
मानधन तुटपुंजे ; पेन्शन व ग्रॅच्युइटीसाठी मंत्रालयात पाठपुरावा करणार – खासदार श्यामकुमार बर्वे
आंगनवाडी सेविकांचा संघर्ष न्याय्य ; शासनाने लवकर निर्णय घ्यावा – श्याम काळे
कन्हान : - आंगनवाडी सेविका व मदतनीस या बालकांचे पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असून, त्यांना आजही अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक सुरक्षेसाठी पेन्शन व ग्रॅच्युइटी तातडीने लागू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी कन्हान येथे आयोजित महिला मेळाव्यात करण्यात आली.
कन्हान शहरातील तारसा चौक येथील कुलदीप मंगल कार्यालयात आंगनवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या वतीने पारशिवनी तालुका व कन्हान शहर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य आयटकचे सचिव श्याम काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सचिव वनीता कापसे, नागपूर जिल्हा सचिव ज्योती अंडरसाहारे, कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती योगिता भलावी, राज्य कौन्सिल सदस्य सुनीता मानकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, श्याम काळे, पत्रकार ऋषभ बावनकर, समाजसेविका रिता बर्वे तसेच सेवानिवृत्त आंगनवाडी सेविकांचा शाल, श्रीफळ व संविधानाची प्रत देऊन सन्मान करण्यात आला.
मेळाव्यात बोलतांना खासदार श्यामकुमार बर्वे म्हणाले की, "आंगनवाडी सेविकांची भूमिका समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बालकांचे पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाची जबाबदारी त्या निष्ठेने पार पाडतात. मात्र त्यांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे आहे. त्यांच्या पेन्शन व ग्रॅच्युइटीसाठी मी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रयत्नशील राहीन , असे आश्वासन दिले ."
राज्य सचिव वनीता कापसे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत महिलांनी संघटित राहण्याचे आवाहन केले. पेन्शन व ग्रॅच्युइटीसाठी मोठा संघर्ष उभारावा लागणार असून, सर्वांनी एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा सचिव ज्योती अंडरसाहारे यांनी पोषण ट्रॅकर प्रभावीपणे कसा भरावा याबाबत मार्गदर्शन केले. तर महिला व बालकल्याण सभापती योगिता भलावी यांनी आंगनवाडी सेविकांच्या पेन्शन व ग्रॅच्युइटी संदर्भात नगरपरिषदेत ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षीय भाषणात श्याम काळे यांनी आंगनवाडी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी आयटकने केलेल्या संघर्षाचा आढावा घेतला. कर्नाटक व गुजरातमध्ये न्यायालयीन लढ्यानंतर ग्रॅच्युइटी लागू झाली असून, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता शासनाने विलंब न करता निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. "आम्ही खोटे बोलत नाही, खोटे काम करत नाही. आमची भूमिका नेहमी सत्याची आणि कामगारांच्या हक्कांची आहे. पेन्शन व ग्रॅच्युइटीसाठी पुन्हा जोमाने संघर्ष करून न्याय मिळवू," असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्यक्रमात स्वर्गीय ईदुताई वामनराव पाहुणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता मानकर यांनी केले, तर आभार प्रमिला वैयकार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी पारशिवनी तालुका सचिव उषा सहारे, कन्हान शहर अध्यक्षा अश्विनी वाघमारे, सचिव प्रमिला वैयकार, समाजसेविका रिता बर्वे, माला खोब्रागडे, राधिका चव्हाण, बेबी ढोरे, नलू बरडे, गौरा राऊत, उषा चौरीवार, दुर्गा मोटघरे, माया कठाळे यांच्यासह मोठ्या संख्येने आंगनवाडी सेविका व महिला उपस्थित होत्या.
आंगनवाडी सेविका या राज्यातील बालकांच्या पोषण, आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. अनेक वर्षांपासून अल्प मानधनावर सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेचा हक्क म्हणून पेन्शन व ग्रॅच्युइटी तातडीने लागू करणे ही काळाची गरज असून, शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भावना महिला मेळाव्यात व्यक्त करण्यात आली.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या