एमजी नगर पुलियावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल ; अपघातानंतर चालक फरार
कन्हान : - कन्हान शहरातील एमजी नगर पुलियावर भरधाव ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवार (दि. ११ जून) रोजी रात्रीच्या सुमारास नितीन नामदेव सरोते (वय ३५, रा. बोरी-सिंगोरी) हे आपल्या अॅक्टिव्हा स्कुटी क्रमांक एमएच ४० बीएन ७४८६ ने कन्हानवरून तारसा मार्गे घरी जात होते. यावेळी तारसा मार्गावरून कन्हानकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ४० बीएल ६४१९ च्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत विरुद्ध दिशेने येऊन दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत नितीन सरोते हे वाहनासह रस्त्यावर कोसळले असून ते गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी नितीन सरोते यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी प्रमोद नामदेव सरोते यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध कन्हान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या