कन्हान परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ; तीन ठिकाणी चोरीच्या घटना
टेकाडीतील दोन घरे फोडली , खंडाळा शिवारातून सोलर पंप लंपास ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कन्हान : - कन्हान परिसरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून तीन ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टेकाडी गावातील दोन बंद घरांमध्ये घरफोडी करून रोख रक्कम व मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्यात आला, तर खंडाळा शिवारातील शेतातून सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा सोलर पंप चोरीला गेला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कन्हान पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर आणि गुन्हे प्रतिबंधक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, टेकाडी येथील रहिवासी नंदकिशोर लेकुरवाळे हे कुटुंबासह देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून कपाटातील सुमारे २० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. त्याच परिसरातील मनोज लेकुरवाळे हे देखील बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील साड्या, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ करण्यात आला. एकाच रात्री सलग दोन घरफोड्या झाल्याने टेकाडी गावात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी सुनील लेकुरवाळे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, खंडाळा शिवारातही चोरीची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. नागपूर येथील नंदकिशोर बिसनलाल गौर यांच्या मालकीच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सोलर पंप चोरून नेला. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभलकर ढाब्यासमोरील शेतात बसविण्यात आलेल्या या सोलर पंपाची किंमत सुमारे ४५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी नंदकिशोर गौर यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
वाढत्या चोरींमुळे नागरिकांमध्ये संताप कन्हान परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, घरफोडी आणि शेतातील साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करावी, संशयितांवर लक्ष ठेवावे आणि चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सतत चोरीच्या घटना घडत असल्याने कन्हान परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना कितपत यश मिळते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले असून आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या