Advertisement

निलज येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा


 निलज येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा


सिलंबम स्पर्धेत ४६ पदके जिंकणाऱ्या खेळाडूंचा सत्कार


कन्हान : - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारशिवनी तालुक्यातील निलज येथे शिवशंभु आखाडा निलज शाखेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


राष्ट्रभक्ती, शौर्य आणि संस्कारांनी ओतप्रोत भरलेल्या या कार्यक्रमात खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.


कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य शिवकुमार यादव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक देवीदास घरडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, विकास प्राथमिक विद्यालय कन्हानचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत तसेच शिक्षक देवेंद्र सेंगर उपस्थित होते.


यावेळी शिवशंभु आखाडा कन्हान, कांद्री, टेकाडी आणि निलज येथील खेळाडूंनी सिलंबम युद्धकलेचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. खेळाडूंच्या शिस्तबद्ध सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष आकर्षण निर्माण झाले.


अलीकडेच रामटेक येथे आयोजित दोन दिवसीय सिलंबम स्पर्धेत शिवशंभु आखाड्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल ४६ पदके पटकावली. या उल्लेखनीय यशामुळे कन्हान शहर व निलज गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या यशस्वी खेळाडूंचा पुस्तक व पेन देऊन सत्कार करण्यात आला.


उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले तसेच युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व आदर्श आचरणात आणावेत, असे आवाहन केले. तसेच खेळाडूंना भविष्यात अधिक यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन चकोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवम पाहुणे यांनी केले.

या कार्यक्रमाचे आयोजन निलज गावचे पोलीस पाटील गुंडेराव चकोले आणि शिवशंभु आखाड्याचे प्रशिक्षक अनिकेत निमजे यांनी केले .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या