महावितरणच्या मनमानीविरोधात शिवसेना (उबाठा)ची कन्हान कार्यालयावर धडक
शेतकरी व नागरिकांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही ; सात दिवसांत समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
कन्हान : - कन्हान शहर व ग्रामीण भागातील शेतकरी आणि वीज ग्राहकांना महावितरणकडून भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महावितरणच्या कन्हान उपविभागीय कार्यालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारण्यात आला. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवरील अन्याय सहन केला जाणार नसल्याचा इशारा माजी खासदार प्रकाश जाधव यांनी यावेळी दिला.
सोमवार (दि. २२ जून) रोजी माजी खासदार प्रकाश जाधव व नागपूर ग्रामीण जिल्हाप्रमुख सुत्तम मस्के यांच्या नेतृत्वाखाली पारशिवनी तालुका प्रमुख रविंद्र चकोले यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता किशोर निंबाळकर यांची भेट घेऊन विविध समस्यांकडे लक्ष वेधले. निवेदनात महावितरण कर्मचाऱ्यांची अरेरावी, बेजबाबदार वर्तन, संपर्क यंत्रणेचा अभाव, अवाजवी व चुकीची वीज बिले, वारंवार होणारी अघोषित वीज कपात, दीर्घकाळ खंडित राहणारा वीजपुरवठा, तक्रार नोंदवहीचा अभाव आदी गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले.
वीजपुरवठा खंडित राहिल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असून अनेक भागांमध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याने गुन्हेगारी व अपघातांचा धोका वाढल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, ग्राहकांच्या फोनला तातडीने प्रतिसाद द्यावा, अघोषित वीज कपात थांबवावी, तांत्रिक त्रुटींमुळे आलेली चुकीची वीज बिले दुरुस्त करावीत तसेच वीज खंडित झाल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
याशिवाय प्रत्येक गावात अधिकृत तक्रार नोंदवही उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना किरकोळ समस्यांसाठी कन्हान कार्यालयाच्या वारंवार चकरा माराव्या लागणार नाहीत, अशी मागणीही करण्यात आली. या सर्व समस्या सात दिवसांच्या आत सोडवाव्यात, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी कन्हान शहर प्रमुख भारत पगारे, कांद्री शहर प्रमुख सुरेश आंबिलढुके, जीवन ठवकर, अभिलाष चकोले, डोमाजी चकोले, चरण येरणे, संकेत राऊळ, प्रदीप चकोले, आयुष राऊळ, सुरेंद्र चकोले, अमोल चांदेवलुके, मंगेश अंबागडे, अमित राऊत, मिलिंद राऊळ, पंकज राऊळ तसेच मोठ्या संख्येने गावकरी व नागरिक उपस्थित होते.
समस्या तातडीने सोडविणार – किशोर निंबाळकर
यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता किशोर निंबाळकर यांनी कन्हान ग्रामीण विभागाचे अभियंता वाघमारे व शहर विभागाचे अभियंता श्रीवास्तव यांना तत्काळ बोलावून संबंधित तक्रारींची दखल घेतली. शेतकरी व नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करून भविष्यात अशा तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या