कन्हानमध्ये भीषण पाणीटंचाई; संतप्त नागरिकांचा नगर परिषदेला घेराव
"पाणी द्या, नाहीतर खुर्ची खाली करा" – प्रशासन आणि जनप्रतिनिधींविरोधात नागरिकांचा संताप उसळला
कन्हान : कन्हान-पिपरी शहरात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईमुळे संतप्त नागरिकांनी अखेर रस्त्यावर उतरून नगर परिषद प्रशासनाविरोधात जोरदार एल्गार पुकारला. कन्हान यूथ फाउंडेशनचे संयोजक कॅप्टन सतीश किशोर बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला. "पाणी द्या, नाहीतर खुर्ची खाली करा", "तहानलेल्या जनतेला न्याय द्या", "झोपलेल्या प्रशासनाला जागे करा" अशा घोषणांनी नगर परिषद परिसर दणाणून गेला. संतप्त नागरिकांनी मुख्याधिकारी दीपक घोडके यांचा तब्बल एक तास घेराव घालत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
कन्हान-पिपरी शहरात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनते. मात्र नगर परिषद प्रशासन आणि जनप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांची खैरात वाटत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वर्षानुवर्षे समस्या कायम असतानाही कोणतीही ठोस व दीर्घकालीन योजना राबविण्यात आलेली नाही.
विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी जनतेला पिण्याचे पाणीही देऊ शकत नसतील, तर त्यांच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. निवडणुकांमध्ये मोठमोठी आश्वासने देणारे अनेक नेते आता नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
सतरापूर, शिवनगर, एमजी नगर, स्वामी विवेकानंद नगर, पिपरी, रामनगर, वाघधरे वाडी, गणेशनगर आदी भागांमध्ये नियमित जलपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी नळांना अत्यंत कमी दाबाने पाणी येत असून काही भागात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठाच बंद असल्याच्या तक्रारी आहेत.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक कुटुंबांना खासगी टँकरचे महागडे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जनता तहानेने व्याकुळ असताना प्रशासन मात्र कागदोपत्री कामे आणि बैठकीतच व्यस्त असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.
मोर्चादरम्यान कॅप्टन सतीश बेलसरे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, तात्काळ प्रभावी उपाययोजना न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. जनता आता आश्वासनांना कंटाळली असून प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा करत आहे.
कन्हान-पिपरीतील वाढता जनक्षोभ हा प्रशासनाच्या अपयशाचा आणि जनप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा आरसा ठरत आहे. आता तरी नगर परिषद जागी होणार की पुन्हा एकदा नागरिकांच्या पदरी केवळ आश्वासनांचीच निराशा पडणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या