Advertisement

बायपास रोडलगतच्या शेतातील विहिरीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ


 बायपास रोडलगतच्या शेतातील विहिरीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ


हत्या , आत्महत्या की अपघाती मृत्यू ? शवविच्छेदन अहवालानंतरच उलगडणार रहस्य


कन्हान : कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर बायपास रोड व नागपूर-हावडा रेल्वेमार्गालगत असलेल्या खंडाळा शिवारातील एका शेतातील विहिरीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे . मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेमागे हत्या , आत्महत्या की अपघाती मृत्यू , याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.४ जून) रोजी दुपारच्या सुमारास शेतमालक रमेश अग्रवाल यांच्या शेतातील निर्जन विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला . शेजारील गोट फार्मचे मालक विनोद यादव यांच्या एका मजुराच्या निदर्शनास ही बाब येताच कन्हान पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली . घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पाहणी केली. 


विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस मित्र अनिल आंबागडे यांची मदत घेण्यात आली. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून टाटा एस वाहनाद्वारे नागपुर येथील मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आला.


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , मृतदेह अनेक दिवसांपासून पाण्यात असल्याने तो फुगलेल्या व कुजलेल्या अवस्थेत होता . त्यामुळे मृत महिलेची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे . महिलेच्या अंगावर तपकिरी रंगाचा सलवार आढळून आला असून पायजमा नसल्याची माहिती समोर आली आहे .


दरम्यान, विहिरीजवळील एका ओसाड घरामध्ये दुपट्टे व इतर काही साहित्य आढळून आल्याने या प्रकरणाला अधिक गूढ वळण मिळाले आहे . या साहित्यामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून घटनेमागील कारणांबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत . तथापि, पोलिसांनी अद्याप कोणतीही शक्यता नाकारलेली नाही. प्राथमिक तपासात हत्या, आत्महत्या तसेच अपघाती मृत्यु या तिन्ही अंगांनी तपास सुरू असून मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


सध्या या संपूर्ण प्रकरणाचे गूढ शवविच्छेदन अहवाल व पोलीस तपासानंतरच उलगडणार आहे . या रहस्यमय घटनेमुळे परिसरात भीती व उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून सर्वांचे लक्ष आता तपासाच्या निष्कर्षाकडे लागले आहे.

कन्हान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या