खदान परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड ; सात आरोपी अटकेत
मोबाईल, दुचाकीसह २ लाख १० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
कन्हान : - कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकाडी शिवारातील खदान क्रमांक ६ परिसरात झाडीझुडपांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून सात जणांना अटक केली. कारवाईदरम्यान मोबाईल, दुचाकी वाहन व रोख रकमेसह एकूण २ लाख १० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध धंदे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि.११ जून) रोजी रात्री नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान परिसरात अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत होते. त्यावेळी गुप्त बातमीदाराकडून टेकाडी शिवारातील खदान क्रमांक ६ परिसरात काही इसम ५२ पत्त्यांच्या साहाय्याने हार-जीतचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी विजय केवलदास गेडाम (वय ४०), मोहसिन मोविन शेख (वय ३५), निलेश मुनेश नानेट (वय ४०), मोबीदउर रहमान अब्दुल रशीद (वय ३०), सूरज रघुवीर मेश्राम (वय ३५), शाहरुख खान शमशेर खान (वय ३०) हे सर्व रा. कामठी, जि. नागपूर तसेच सचिन प्रकाश यादव (वय ३९, रा. कन्हान) यांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले.
पोलिसांनी पंचनामा करून आरोपींकडून ५२ ताशपत्ते, रोख रक्कम ४० हजार ६०० रुपये, हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (क्र. एमएच-३१-एयू-८५९२), मोबाईल फोन, दरी, एलईडी लाईट व इतर साहित्य असा एकूण २ लाख १० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या