कन्हानची उपेक्षा कायम ; घाणीच्या साम्राज्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात
प्रशासन आणि लोकप्रतिनिधीं विरोधात नागरिकांचा संताप
वाघधरे वाडी, विष्णुलक्ष्मी नगर, एमजी नगर परिसरातील गंभीर समस्या ; कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा
कन्हान : - कन्हान-पिपरी शहरातील वाघधरे वाडी, विष्णुलक्ष्मी नगर आणि एमजी नगर परिसरात स्वच्छतेचा पूर्णतः बोजवारा उडाला असून नागरिकांना घाणीच्या विळख्यात जीवन जगावे लागत आहे. तुडुंब भरलेल्या नाल्या, साचलेले दूषित पाणी, खराब गटार व्यवस्था आणि सर्वत्र पडलेले कचऱ्याचे ढिगारे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते नयन खोब्रागडे, नितीन मेश्राम आणि संदीप शेंडे यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत परिसरातील गंभीर समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात नाल्या, गटारे आणि कालव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व दूषित पाणी साचल्याने दुर्गंधी पसरत असून डेंग्यू, मलेरिया, टायफॉईडसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढत असल्याचे नमूद केले आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, वारंवार तक्रारी करूनही नगर प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनांची खैरात वाटत आहेत. प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. पावसाळा तोंडावर असतानाही नाल्यांची साफसफाई आणि गटार दुरुस्तीची कामे रखडलेली असल्याने भविष्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे असेच दुर्लक्ष सुरू राहिल्यास या प्रश्नाचे रूपांतर मोठ्या जनआंदोलनात होऊ शकते. "स्वच्छ कन्हान, स्वस्थ कन्हान" हे केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्षात उतरविण्याची जबाबदारी प्रशासनाची असून नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या यंत्रणेने आता तरी कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
नागरिकांचा सवाल
"निवडणुकांच्या वेळी मतांसाठी दारोदारी फिरणारे लोकप्रतिनिधी आता नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांवर मौन का बाळगत आहेत ? प्रशासन आणि जनप्रतिनिधी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत का ?" असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी तात्काळ नालेसफाई, गटार दुरुस्ती आणि कचरा व्यवस्थापनाची ठोस कार्यवाही न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या