Advertisement

कन्हान परिसर योगमय ; ठिकठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा




 कन्हान परिसर योगमय ; ठिकठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

 

शाळा, पोलीस विभाग, सामाजिक संस्था व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग


निरोगी जीवनशैलीचा दिला संदेश


कन्हान : - "योग करा, निरोगी रहा" हा संदेश देत कन्हान परिसरात रविवारी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शैक्षणिक संस्था, पोलीस विभाग, राजकीय संघटना आणि विविध नागरिक मंचांच्या वतीने योग शिबिरे, प्रात्यक्षिके व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. योगाच्या माध्यमातून आरोग्य, मानसिक शांतता आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.


विकास प्राथमिक शाळा, कन्हान


विकास प्राथमिक शाळा, कन्हान येथे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक शशिकांत बोंद्रे, देवेंद्रसिंह सेंगर, शरद डोकरीमारे, सौ. कविता भगत, रूपराव भोंगाडे तसेच शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात २१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असून याच दिवसाला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जागतिक मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली. योगामुळे शरीर सुदृढ, मन प्रसन्न आणि जीवन शिस्तबद्ध बनते, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.


छत्रपती शिवाजी स्मारक परिसर , कन्हान


छत्रपती शिवाजी स्मारक परिसरात योग मार्गदर्शिका स्वातीताई खुरपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष योग शिबिर पार पडले. त्यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष योगाभ्यास करून घेतला. योग हा निरोगी जीवनाचा पाया असून प्रत्येकाने दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करावा, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी छत्रपती शिवाजी स्मारक समिती व शिवाजीनगर मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.



भारतीय जनता पार्टी, कांद्री शहर


भारतीय जनता पार्टी, कांद्री शहर यांच्या वतीने कांद्री येथील योगा सेंटरमध्ये योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योगगुरू ओमप्रकाशजी कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी योग हा आरोग्य, शांती आणि समृद्धीकडे नेणारा प्रभावी मार्ग असल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाने योगाला आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावा, असा संदेश दिला.



कन्हान पोलीस स्टेशन


कन्हान पोलीस स्टेशनमध्येही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील आणि नागरिकांनी सामूहिक योगाभ्यास केला. यावेळी वैजयंती मंडवधरे, सुषमा मस्के आणि कांचन मस्के यांनी योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्थैर्य आणि कार्यक्षमता वाढते, असे सांगून नियमित योग करण्याचे आवाहन केले.


आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात योगाचे महत्त्व अधिक अधोरेखित होत असून, कन्हान परिसरातील विविध उपक्रमांनी योगाबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत "योग हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली" असल्याचा संदेश दिला.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या