Advertisement

प्रगती नगर व सुपरटाऊन परिसरातील विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी


प्रगती नगर व सुपरटाऊन परिसरातील विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी


कन्हान शहर विकास मंच व स्थानिक नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन


कन्हान : - कन्हान शहरातील प्रगती नगर व सुपरटाऊन परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात यावे, अशी मागणी कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक घोडके यांना निवेदनाद्वारे केली.


निवेदनात नमूद करण्यात आले की, प्रगती नगर व सुपरटाऊन परिसरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचणे व घरांमध्ये पाणी शिरण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. यंदाही पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, गहुहिवरा रोड पुलियाजवळील छोट्या नाल्यातून तसेच पानतावणे कॉलेज परिसरातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहून येऊन थेट प्रगती नगर व सुपरटाऊन परिसरात शिरते. त्यामुळे नागरिकांच्या घरांचे, मालमत्तेचे तसेच आरोग्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला होता. अनेक नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला होता. मात्र, आजपर्यंत या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


यासोबतच परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. सिमेंट रस्त्यांच्या अभावामुळे नागरिकांना दररोज मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. परिसरात अद्याप सिमेंट रस्त्यांची उभारणी करण्यात आलेली नसल्याने पावसाळ्यात चिखल, पाणी साचणे, डासांचा प्रादुर्भाव वाढणे यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


 नागरिकांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधी व नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी, निवेदने व मागण्या सादर करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या न्याय्य मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची भावना परिसरातील जनतेमध्ये निर्माण झाली आहे. नागरिकांच्या करातून मिळणारा निधी नेमका कुठे खर्च केला जात आहे? प्रगती नगर व सुपरटाऊन परिसर विकासापासून का वंचित ठेवला जात आहे? स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन याबाबत मौन का बाळगत आहेत? असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत.


सुपरटाऊनमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या ; शुद्ध पिण्याचा पाण्याची पाईपलाईनची तातडीने व्यवस्था करा 


सुपरटाऊन परिसरातील नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आजही या परिसरात नळाच्या शुद्ध पाण्याची पाईपलाईन उपलब्ध नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मात्र या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात अनेक वेळा निवेदने देऊन व पाठपुरावा करून ही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुद्ध पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सुपरटाऊन परिसरात नळाच्या शुद्ध पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.


या विविध समस्यांच्या निराकरणासाठी कन्हान शहर विकास मंच चे सल्लागार सूर्यभान चकोले यांच्या नेतृत्वात मंच च्या पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी दिपक घोडके यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी मुख्याधिकारी दिपक घोडके यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे तोंडी निर्देश दिले तसेच लवकरच समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले .


या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , नारायण गजभिए , अर्चना तांडेकर , संदीप पोकळे , संतोष दहीफळकर , दिपक गुप्ता , दिलीप लाडेकर , दिपक तिवारी , सुरेश वाघमारे , दत्तु खडसे , निखिल मेश्राम , अभिषेक साखरे , अर्जुन पात्रे , मारोतराव भोयर , सागर नानवटकर , आलोक सरोदे , राहुल चौरे , ताराचंद मेश्राम , सुदामा घोडेस्वार , अरुण सहारे , अजय डेरिया , प्रवीर दुरगडे , राहुल मंगर , जगदीश साठवणे , पद्माकर वासनिक , दिलीप बंड , पिंकी बेहेटवार , हौशीलाल पुंडे , प्रिती गोंडाणे सह आदि नागरिक मोठ्या उपस्थित होते .


सह संपादक - ऋषभ बावनकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या