अवैध गो-तस्करी व पशू क्रूरता तातडीने थांबविण्याची मागणी
गौ सेवा समिती कन्हान क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांचे पोलिस निरीक्षकांना निवेदन
कन्हान : कन्हान व ग्रामीण परिसरात वाढत असलेल्या अवैध गो-तस्करी आणि पशूंवरील क्रूरतेला तातडीने आळा घालावा, अशी मागणी गौ सेवा समिती कन्हान क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कन्हान परिसरात गेल्या काही दिवसांपासून उशिरा रात्रीपासून पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशीय जनावरांची तस्करी केली जात आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्थेला उघडपणे आव्हान दिले जात आहे. तसेच समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून परिसरात सांप्रदायिक तणाव निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गो-तस्करांकडून मुख्यत्वे तारसा रोड, निलज, खंडाळा, सिहोरा, सत्रापूर मार्ग, पिपरी गाडेघाट, जुनी कामठी मार्ग तसेच नागपूर–मनसर–जबलपूर महामार्गावरील टोलनाके व इतर ग्रामीण रस्त्यांचा वापर केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जनावरांना वाहनांमध्ये अमानुषपणे कोंबून, चारा-पाण्याविना वाहतूक केली जात असून हा गंभीर कायदेशीर गुन्हा असल्याचे समितीने म्हटले आहे.
शासनाच्या आदेशानुसार बिंदू क्रमांक ७ आणि ८ नुसार पोलिसांनी इतर विभागांच्या सहकार्याने संयुक्त भरारी पथके स्थापन करून अवैध कत्तलखान्यांवर छापेमारी करावी. तसेच डायल ११२ हेल्पलाइनवर गो-तस्करी किंवा अवैध कत्तलीबाबत तक्रार प्राप्त होताच तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गौ सेवा समितीने मागणी केली आहे की, गो-तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर आणि टोलनाक्यांवर अचानक नाकाबंदी करून रात्रीची गस्त वाढवावी. तसेच या अवैध कृत्यात सहभागी असलेल्या मुख्य सूत्रधार व वाहन मालकांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तस्करीसाठी वापरली जाणारी सर्व वाहने जप्त करून ती सहजपणे न्यायालयातून सुटू नयेत, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांना हे प्रकरण गांभीर्याने घेऊन महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या २१ मे २०२६ च्या परिपत्रकानुसार ‘मकोका’ तसेच इतर अजामीनपात्र कलमांखाली कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गो-तस्करीवर तातडीने नियंत्रण आणले नाही, तर नागरिकांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही गौ सेवा समिती कन्हान क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळीइस अवसर पर गौ सेवा समिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साई कनोजिया , सचिव लोकेश दमाहे , कन्हान क्षेत्र प्रमुख शुभम बावनकर , सदस्य ओम हजारे , प्रणय वाडीभस्मे , चैतन्य ओझा , ऋषभ बावनकर , दिनेश भाई , तुषार रारैया , हिमांशू हुमाने , रोहित कनोजिया , आकाश कोठारी , प्रशांत सोनोडिया , सुकेश पाटील यांच्या सह आदि सदस्य उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या