गट ग्रामपंचायत भागेमहारी येथे भरारी उत्पादक महिला शेतकरी गटांच्या पुढाकाराने दशपर्णी अर्क निर्मितीला वेग
पारशिवनी तालुक्यात नैसर्गिक शेतीचा जागर ; कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पारशिवनी : - वाढता उत्पादन खर्च, रासायनिक खतांवरील वाढते अवलंबित्व आणि शेतीमालाच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर पारशिवनी तालुक्यातील गट ग्रामपंचायत भागेमहारी येथे नैसर्गिक शेतीची चळवळ वेगाने रुजत आहे. कृषि विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी उत्पादक महिला शेतकरी गटांच्या पुढाकारातून नैसर्गिक शेतीचा व्यापक जागर सुरू असून शेतकरी मोठ्या उत्साहाने या मोहिमेत सहभागी होत आहेत.
विषमुक्त अन्न उत्पादन, जमिनीची सुपीकता वाढविणे आणि शेतीचा खर्च कमी करणे या उद्देशाने भागेमहारी परिसरात दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, जीवामृत, गांडूळखत तसेच स्थानिक स्तरावर उपलब्ध नैसर्गिक घटकांपासून विविध जैविक उत्पादने तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
विशेष म्हणजे, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून भरारी उत्पादक महिला शेतकरी गटांनी सामूहिक पद्धतीने दशपर्णी अर्क निर्मितीची मोहीम हाती घेतली आहे.
ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. ज्योती प्रेम भोंडेकर यांच्या पुढाकारामुळे या उपक्रमाला नवे बळ मिळाले आहे.
तालुका कृषि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील महिला एकत्र येऊन दशपर्णी अर्क तयार करत आहेत. त्याचबरोबर आगामी खरीप हंगाम लक्षात घेऊन निंबोळी अर्क निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात निंबोळ्यांचे संकलन करण्यात येत आहे. त्यामुळे नैसर्गिक कीडनियंत्रणासाठी आवश्यक जैविक घटक स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार आहेत.
शेतकऱ्यांना कमी खर्चात, शाश्वत व पर्यावरणपूरक शेती करता यावी यासाठी कृषि विभागाकडून सातत्याने प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जात आहे. याशिवाय उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी गांडूळखत, जीवामृत, बेल फळांपासून पोटॅश आणि पळसाच्या फुलांपासून बोरॉन निर्मिती यांसारखे नाविन्यपूर्ण प्रयोगही राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमांमुळे नैसर्गिक संसाधनांचा प्रभावी वापर वाढत असून रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी करण्यास मदत होत आहे. परिणामी शेतकरी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असून नैसर्गिक शेतीबाबतचा त्यांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
कृषि विभाग आणि पाणी फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नांना भरारी उत्पादक महिला शेतकरी गटांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भागेमहारी परिसरात नैसर्गिक शेतीची चळवळ आणखी व्यापक होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या