वाघधरे वाडी येथे घरफोडी ; सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास
४६ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांचा डल्ला; कन्हान पोलिसांत गुन्हा दाखल
कन्हान : - कन्हान शहरातील वाघधरे वाडी परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमर हेमंत शेंडे (वय ४०) रा. वाघधरे वाडी, कन्हान हे आपल्या कुटुंबासह १६ जून रोजी घराला कुलूप लावून सासरवाडी मुंडीकोटा (ता. तुमसर) येथे गेले होते. दरम्यान, २० जून रोजी सकाळी शेजारी राहणारे शक्ती गायकवाड यांनी फोनद्वारे त्यांच्या घराचे कुलूप तुटले असल्याची माहिती दिली.
यावरून अमर शेंडे हे तातडीने कुटुंबासह घरी परतले. घराजवळ पोहोचल्यावर मुख्य दरवाजाचे कुलूप तसेच आतील दरवाजाची कुंडी तोडलेली दिसून आली. घरात प्रवेश करून पाहणी केली असता किचनमधील लोखंडी गोदरेज आलमारी उघडी असून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळले.
आलमारीत ठेवलेली २० हजार रुपयांची रोख रक्कम, अंदाजे १.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कुंडल (किंमत १० हजार रुपये), सुमारे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बोंगले व कुडके (किंमत १५ हजार रुपये) तसेच २० ग्रॅम वजनाची चांदीची कडी (किंमत १,५०० रुपये) असा एकूण ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी अमर शेंडे यांनी कन्हान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांवर अंकुश ठेवावा, नागरिकांची मागणी
कन्हान परिसरात अलीकडील काळात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. बंद घरांवर पाळत ठेवून चोरटे चोरीच्या घटना घडवत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांवर अंकुश ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या