Advertisement

६ हजार चौरस फूट शेड प्रकरणात तब्बल लाखोंची फसवणूकीचा आरोप


 ६ हजार चौरस फूट शेड प्रकरणात तब्बल लाखोंची फसवणूकीचा आरोप


कराराच्या नावाखाली बँक निधीचा अपहार ; ठेकेदार कृष्ण चौहान विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी


काम अपूर्ण ठेवून लाखो रुपये लाटल्याचा आरोप ; कन्हान पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी – पीडितांची मागणी


कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत खेडी येथे फॅक्टरी शेड उभारणीच्या कराराच्या नावाखाली लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि बँक निधीचा कथित अपहार केल्याचा गंभीर आरोप नागपूर येथील ठेकेदार कृष्ण एस. चौहान याच्यावर करण्यात आला असून, या प्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडितांनी आरोपी विरुद्ध तत्काळ एफआयआर नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


तक्रारदार अमित एस. उके यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या ‘गोल्डनशिप ओव्हरसीज’ या उद्योगासाठी ६,००० चौरस फूट फॅक्टरी शेड उभारण्याचे काम कृष्ण चौहान याला देण्यात आले होते. या कामाचा एकूण करार तब्बल १८ लाख ६२ हजार रुपये इतक्या रकमेचा होता. करारानुसार ४५ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तक्रारीनुसार, कामाची सुरुवात करण्यासाठी आरोपीच्या खात्यात ९ लाख ६५ हजार रुपये आगाऊ रक्कम जमा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण न करता आरोपीने केवळ काही दिवसांतच स्टेट बँक ऑफ इंडियामधून प्रकल्पाची संपूर्ण रक्कम स्वतःच्या खात्यात वळती करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामध्ये संबंधित बँक अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या संगनमताची शक्यताही तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे.


पीडितांच्या म्हणण्यानुसार, लाखो रुपये उचलूनही काम पूर्ण करण्यात आले नाही. परिणामी उद्योग सुरू होऊ शकला नसून तक्रारदारांना दरमहा हजारो रुपयांचे बँक व्याज व जागेचे भाडे भरावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात दुसरे तक्रारदार मोहम्मद मोबीन यांनीही कृष्ण चौहान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पेटी कंत्राटाच्या कामासाठी ठरलेली रक्कम पूर्ण न देता १ लाख २० हजार रुपये थकविल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित व्यक्ती सध्या संपर्कात नसून राहत्या पत्त्यावरही आढळत नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

विशेष म्हणजे, कृष्ण चौहान यांच्या विरोधात यापूर्वीही सेलू (जि. वर्धा) येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ आर्थिक वाद नसून नियोजनबद्ध फसवणुकीचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


कन्हान पोलिसांनी तातडीने कारवाई करावी


पीडितांनी कन्हान पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार सादर करून आरोपी कृष्ण चौहान तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या अज्ञात बँक अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (BNS) फसवणूक, विश्वासघात, आर्थिक अपहार आणि कटकारस्थानाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


नागरिकांमध्ये संताप


लाखो रुपयांचा व्यवहार, अपूर्ण कामे आणि कथित बँक निधीचा गैरवापर या गंभीर आरोपांमुळे व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा अशा प्रकारच्या फसवणुकीला प्रोत्साहन मिळेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या