खेडी शिवारात भीषण आग ; शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत कष्टांची राख
गावकऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी वाचले गाव ; महिलांची हाक , मुलांचा आक्रोश
कन्हान: - पारशिवनी तालुक्यातील खेडी (खोपडी) गावालगत शुक्रवारी (दि.२७) मार्च रोजी दुपारी लागलेल्या भीषण आगीने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला . काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण करत सुमारे ५० एकरांतील गव्हाच्या काडीकचऱ्याला भस्मसात केले . वाऱ्याच्या जोरावर ज्वाळा गावाकडे सरकू लागल्याने संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले . शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या कष्टांची राख होत असल्याचे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले .
Massive Fire in the Fields of Khedi; Farmers' Hard Work Reduced to Ashes Before Their Very Eyes
दुपारी सुमारे २.३० वाजताच्या सुमारास अचानक हवामान बदलले आणि जोरदार वारे वाहू लागले . याच वेळी कापणी झालेल्या गव्हाच्या शेतात पडलेल्या काडीकचऱ्याला आग लागली . काही क्षणांतच ही आग एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरत गेली . आगीच्या लाटा गावाच्या दिशेने झेपावत असल्याचे दिसताच गावात एकच गोंधळ उडाला .
“माझं सगळं संपलं रे… वर्षभराचं कष्ट एका क्षणात जळून गेलं,” असे उद्विग्न शब्द उच्चारत अनेक शेतकरी घटनास्थळी धावतांना दिसले . काही शेतकरी जिवाची पर्वा न करता ज्वाळांमध्ये शिरून उरलेली कणसं वाचवण्याचा प्रयत्न करीत होते . महिलांचा आक्रोश , लहान मुलांचे रडणे आणि “आग विझवा… गाव वाचवा” अशा हाका परिसरात घुमत होत्या.
गावातील युवक , शेतकरी आणि नागरिकांनी पाणी , माती , झाडांच्या फांद्या यांचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला . काहींनी तातडीने कन्हान - पिपरी नगरपरिषद व पारशिवनी तहसील कार्यालयाला कळविले . माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब वाहन घटनास्थळी दाखल झाले . जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
दरम्यान , काही शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेला गहू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवून मोठे नुकसान टाळले . मात्र गव्हाच्या काडीकचऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत .
या बचाव कार्यात गावातील युवक , महिला व नागरिकांनी मोठ्या धैर्याने सहभाग घेतला . “गाव वाचवायचं होतं, म्हणून सगळे जीव तोडून प्रयत्न करत होतो,” अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे खेडी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . मात्र ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आणि गाव आगीच्या विळख्यातून थोडक्यात बचावले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या