टेकाडी शिवारातील शेतात आग लागल्याने गव्हाच्या पीकाची राख रांगोळी
शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिसकावल्याने शेतकरी चिंतातुर , शासनाकडे मदतीची मागणी
कन्हान : - पारशिवनी तहसील अंतर्गत टेकाडी शिवारातील टेकाडी - बोरडा पांधन रस्त्या लगतच्या गव्हाच्या शेतात अचानक आग लागली . आगीत जवळपास शंभर एकरातील उभे गव्हाचे पीक जळुन राख रांगोळी झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला . काबडकष्ट केलेल्या शेतकऱ्यांचा तोंडचा घास आगीने हिसकावल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थीक मदतीची मागणी शासनाकडे केली आहे .
शेतकऱ्यांनी सांगितले की , सोमवार (दि.२३) मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता दरम्यान शैलेश सातपैसे हे रतन आणि गणेश कांबळे यांची १३ एकर शेती ठेक्याने केलेल्या शेतातील उभ्या गव्हाच्या पीकाला अचानक आग लागली . वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले आणि शेजारील शेतांमध्ये झपाट्याने पसरली . रतन कांबळे, गणेश कांबळे (१३ एकर) , कमलाकर राऊत (२ एकर) , श्यामराव मरघडे (२.५ एकर) , गुलाब राउत (५ एकर) , नामदेव कांबळे (१.५ एकर) , संदीप राऊत (५ एकर) , रामभाऊ राऊत (२ एकर) , शकुंनबाई सावरकर (२ एकर) , उत्तम सातपैसे (६ एकर) , रामराव सातपैसे (१.५ एकर) , येणेकर (१२.५ एकर) यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे गव्हाचे पीक आगीत जळाले . या घटनेत आगीवर नियंत्रण मिळे पर्यंत जवळपास शंभर एकरातील उभे गव्हाचे पिक जळुन राख रांगोळी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले . शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास आगीने हिसकाविल्याने परिवाराच्या उदनिर्वाकरिता शेतकरी चिंतातुर झाला आहे . शेतकऱ्यांनी आपल्या परिने आग विझविण्याचा पर्यंत केला . परंतु तो पर्यंत गव्हाचे पीक जळुन नष्ट झाले .
घटनेची माहिती अग्निशामक विभागाला मिळताच नगरपरिषद कन्हान-पिपरी , कामठी , नगरपंचायत कांद्री, महादुला येथील चार गाड्या घटनास्थळी दाखल झाले . मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले . त्यामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांचे पीक वाचले . घटनास्थळी कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे , सपोनि रोशन बावनकर , रोशन देवतळे , सम्राट वनप्रती सह पोलीस कर्मचाऱ्यांनी पोहचुन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले . तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचुन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचा पंचनामा करून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला आहे .
आगीने झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरकार , शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी बोरडा ग्रामपंचायत उपसरपंच नरेंद्र ठाकरे , भगवानदास यादव , राजु गुडधे , हरिश भेलावे , शैलेश सातपैसे , रामकृष्ण हुड , विशाधर कांबळे , क्रिष्णा कांबळे , टेकाडी , बोरडा सह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे .
Wheat-Crop-Reduced-to-Ashes-After-Fire-Breaks-Out-in-Fields-in-Tekadi-Area
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या