कन्हान शहरात चोरट्यांचा धुमाकुळ , एकाच रात्री दोन दुकानाचे शटर फोडले
खाकीतच चोरांना संरक्षण , देत आहेत काय ; गुन्हेगारांना अटक कधी होणार ?
पोलिसांची ग्रस्त नेमकी कुठे होती , कन्हान पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्न निर्माण ?
पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी कन्हान पोलीस स्टेशन कडे लक्ष वेधण्याची गरज
Thieves break out in Kanhan city, shutters of two shops broken in one night
कन्हान : - कन्हान शहरात एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडत असतांना पोलिसांची ग्रस्त नेमकी कुठे होती , असा प्रश्न नागरिक विचारत आहेत . महामार्गा वरील डोणेकर सभागृहा जवळील विजय कॉम्प्लेक्स मध्ये सलग दोन दुकाने फोडून चोरट्यांनी रोकड व मुद्देमाल लंपास केला , तर रायनगर मध्ये किराणा दुकानात चिल्लर पैश्यावर हात साफ केल्याचे बोलले जात आहे . या घटनेमुळे व्यापारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . गुन्हेगार इतक्या बिनधास्तपणे शटर फोडतात , सीसीटीव्हीत कैद होतात आणि तरीही पोलिसांना सुगावा लागत नाही , ही बाबच संशय निर्माण करणारी ठरत आहे . यामुळे कन्हान पोलिसांच्या भुमिकेवर सुद्धा प्रश्न निर्माण झाले आहे .
प्राप्त माहिती नुसार अंकित विजय कालरा यांच्या दूध डेअरीतून मोबाईल , चांदीची मूर्ती , रोकड असा सुमारे आठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला . तसेच शेजारील फिश पॉल दुकानातील गल्ल्यातील रक्कमही चोरट्यांनी पळविली . त्याच रात्री रायनगर मध्ये घराच्या भिंतीवरून उडी मारत किराणा दुकानात शिरले आणि गल्यातील चिल्लर पैसे चोरुन पसार झाले .
एकाच रात्रीत तीन घटना घडणे म्हणजे गुन्हेगारांना कुणाचे तरी ‘आशीर्वाद’ असल्याशिवाय शक्य नाही , अशी कुजबुज शहरात सुरू झाली आहे .
विशेष म्हणजे , ग्रामीण भागात तैनात 112 आपत्कालीन वाहनाच्या हालचालींवरही बोट ठेवले जात आहे . सिंगोरी - बोरी , रेती घाट , टोल प्लाझा परिसरात अवैध रेती वाहतूक सुरू असतांना 112 वाहन तेथेच का दिसते ? शहरात चोरी होत असतांना गस्तीचे नियोजन कोठे अडकते ? “खाकीतच काही जण गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत का ?” असा थेट प्रश्न व्यापारी विचारत आहेत . जीपीआरएस प्रणाली बसवून 112 वाहनाच्या हालचालींची थेट देखरेख करावी , तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी , अशी जोरदार मागणी होत आहे .
मात्र गुन्हेगारांना अटक कधी होणार , हा खरा मुद्दा आहे .
पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाल्या , फुटेज तपास सुरू आहे , अशी नेहमीची प्रतिक्रिया दिली जात आहे ; मात्र गुन्हेगारांना अटक कधी होणार , हा खरा मुद्दा आहे . घरफोडी , वाहनचोरी , कोळसा व लोखंड चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिक आधीच त्रस्त आहेत . त्यातच एका रात्रीत तीन ठिकाणी चोरी होणे म्हणजे कायदा - सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे लक्षण असल्याची टीका होत आहे .
पोलीस अधिक्षकांनी परिस्थितीचा आढावा घेऊन कारवाई करावी , नागरिकांची मागणी
नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तातडीने कन्हान मधील परिस्थितीचा आढावा घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी , अशी मागणी पुढे येत आहे . “गुन्हेगार मोकाट आणि नागरिक भयभीत” ही अवस्था अधिक काळ चालणार नाही , असा इशाराही संतप्त नागरिक देत आहेत . आता प्रश्न एकच - खाकी जनतेच्या संरक्षणासाठी की काहींच्या संगनमतासाठी ? अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या