पोलीस असल्याचा बनाव करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणुक
खंडाळा शिवारात १ लाख ५० हजार रुपयाचे दागिने लंपास.
कन्हान : - पोलीस असल्याचा बनाव रचत तीन अनोळखी इसमांनी ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा खंडाळा शिवारात घडली . आयुष्यभर कष्ट करून जमवलेली कमाई काही क्षणांत हिरावुन गेल्याने संबंधित ज्येष्ठ नागरिक हादरून गेले असुन परिसरात संताप व्यकत करित भीतीचे वातावरण पसरले आहे .
इंदिरा नगर, पाण्याची टाकी जवळ कन्हान येथे राहणारे परसराम संपत वैरागडे वय ६४ वर्ष हे वेकोलि सावनेर येथुन सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत . निवृत्तीनंतर शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या परसराम यांच्यावर अचानक ओढावलेल्या या घटनेने त्यांचे कुटुंबही सुन्न झाले आहे . सोमवार (दि.९) रोजी सकाळी ११.३० वाजता च्या दरम्यान परसराम वैरागडे हे आपल्या मोटारसायकलने बोरी शिंगोरीकडे निघाले होते . सकाळी ११.४५ ते १२ वाजता सुमारास मौजा खंडाळा शिवारात रोडवर एका अनोळखी इसमाने त्यांना अडविले . “आम्ही पोलीस आहोत , तुम्ही थांबला नाही,” असे सांगत त्याने विश्वास निर्माण केला . काही क्षणांतच आणखी दोन अनोळखी इसम तेथे आले . “वरून आदेश आहेत , दागिने घालुन जाऊ नका ,” असे सांगत तीघांनी परसराम यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे (२० ग्रॅम) जुने वापरते सोन्याचे गोप आणि पाच ग्रॅमची अंगठी काढुन घेतली . एकुण १ लाख ५० हजार रुपयांचे दागिने एका कागदात गुंडाळुन रुमालात ठेवुन दिल्याचे भासवुन तीघेही नागपुरच्या दिशेने पसार झाले . काही वेळाने रुमाल उघडुन पाहताच त्यात खरे दागिने नसुन बनावट पिवळ्या रंगाची अंगठी आढळली . आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच परसराम वैरागडे यांचे हात थरथर कापु लागले . त्यांनी तात्काळ घरी जाऊन मुलाला घडलेला प्रकार सांगितला आणि कन्हान पोलीस ठाण्यात धाव घेतली .
या प्रकरणी कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपीं विरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी तपास सुरू केला असुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे . पोलीस असल्याचा बनाव करून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहावे , कुणीही ओळखपत्रा शिवाय पोलीस असल्याचे सांगितल्यास थेट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा , असे आवाहन कन्हान पोलिसांनी केले आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या