Advertisement

कन्हान - पिपरी नगर परिषद नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांनी पदभार स्वीकारला

कन्हान - पिपरी नगर परिषद नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांनी पदभार स्वीकारला

बहुमताने सत्ता दिल्याबद्दल नागरिकांचे मानले आभार

कन्हान : - कन्हान - पिपरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राजेंद्र शेंदरे यांनी गुरुवार (दि.८) जानेवारी रोजी उत्साहपुर्ण वातावरणात पदभार स्वीकारला . नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीत मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने पार पडलेल्या या पदग्रहण सोहळ्यात त्यांनी बहुमताने सत्ता दिल्याबद्दल शहरवासीयांचे आभार मानले .
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महसूल आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाईल, असा ठाम विश्वास नगराध्यक्ष शेंदरे यांनी व्यक्त केला . शहरासाठी जाहीरनाम्यात नमूद केलेल्या स्वच्छ पाणीपुरवठा योजना , साप्ताहिक  , गुजरी बाजारासाठी स्थायी जागेची योग्य व्यवस्था , बसस्थानक उभारणे , सुसज्ज स्मशानभूमी , सुलभ शौचालय निर्माण करणे , आदी विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल . पाच वर्षांत कन्हान शहराचा कायापालट करून दाखवू , असे त्यांनी सांगितले. या कामासाठी सर्व नगरसेवकांचे भक्कम सहकार्य लाभेल , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला . २१ डिसेंबर रोजी लागलेल्या निवडणूक निकालानंतर नगराध्यक्ष पदग्रहणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते . भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शहरवासीयांनी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांच्यासह १४ नगरसेवकांना निवडून देत कन्हान नगरपरिषदेची सत्ता भाजपकडे एकहाती सोपवली आहे .

या पदग्रहण सोहळ्यास भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी   सदस्य डॉ. राजीव पोतदार , भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत , माजी आमदार सुधाकर कोहळे , माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये , जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंह (गज्जू) यादव , सुनंदाताई दिवटे , जिल्हा महामंत्री अनिल निधान , अविनाश खडतकर , राहुल किरपान , अॅड.गजानन आसोले , माजी जि.प. गटनेते व्यंकटेश कारेमोरे , कन्हान मंडळ अध्यक्ष बिरेंद्र सिंग , कन्हान शहराध्यक्ष महेंद्र साबरे , माजी जि. प. उपाध्यक्ष शरद डोणेकर आदी मान्यवर उपस्थित होते .

मुख्याधिकारी दीपक घोडके यांनी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व गोड पेढा भरवून पदग्रहणाची औपचारिक घोषणा केली . कार्यक्रमाचे सूत्र संचालन निलकंठ मस्के यांनी केले . नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांनी उपस्थित सर्व मान्यवर , भाजप पदाधिकारी , नगरसेवक , पत्रकार व शहरवासीयांचे मनःपूर्वक आभार मानले . पदग्रहण सोहळ्यास शहरातील महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या