निवडणुक कामांचा भार , रिक्त पदांचा फटका ; मराठी शिक्षण व्यवस्थेचे भवितव्य अंधारात
शाळा बंद , शिक्षक ताणावखाली ; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवण्याची मागणी.
कन्हान : - ग्रामीण भागातील मराठी शाळा आधीच अस्तित्वासाठी झगडत असतांना निवडणुक प्रक्रिया व विविध शाळाबाह्य शासकीय कामांचा वाढता भार शिक्षण व्यवस्थेवर घाला घालत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे . नागपुर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय , कन्हान येथे १ व ८ जानेवारी २०२६ रोजी शाळा बंद ठेवावी लागल्याने शिक्षण विभाग व महानगरपालिकेच्या यंत्रणेत खळबळ उडाली आहे .
नगर सुधार समितीने शाळा बंद ठेवण्याबाबत खुलासा मागितल्यानंतर मुख्याध्यापक प्रविणकुमार प्रेमराज साबळे यांनी सविस्तर स्पष्टीकरण सादर केले आहे . दि. १ व ८ जानेवारी रोजी आयुक्त तथा निवडणुक अधिकारी , नागपुर महानगरपालिका यांच्या आदेशानुसार शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी निवडणुक प्रशिक्षणासाठी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग येथे उपस्थित होते . त्या दिवशी शाळेत केवळ दोन शिपाई उपलब्ध होते . विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह अध्यापन करणे अशक्य असल्याने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले .
दरम्यान, या शाळेत आधीच तीन शिक्षकांची पदे रिक्त आहेत . सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार ही पदे मंजुर असुनही समायोजन प्रक्रियेला स्थगिती असल्याने भरती रखडली आहे . याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद नागपुर यांना वेळोवेळी देण्यात आली आहे . मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. ग्रामीण भागातील मराठी शाळांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे . विद्यार्थीसंख्या घटत असुन पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत आहे .
परिणामी मराठी शाळांतील शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थी टिकवण्यासाठी अक्षरशः दारोदारी जाऊन पालकांची समजुत काढावी लागत आहे . विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा , इतर शैक्षणिक सोयी उपलब्ध करून देणे , वेळोवेळी पालकांशी संवाद साधणे अशी अनेक कामे शिक्षक स्वतःच्या खिशातुन खर्च करून करित आहेत . याच बरोबर शासनाकडुन निवडणुक , जनगणना , सर्वेक्षण , स्वच्छता मोहिमा , तसेच एबीसी (Animal Birth Control) कार्यक्रमांतर्गत शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारीही शाळांवरच टाकण्यात आली आहे . या शिक्षण बाह्य कामांमुळे शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे . याचा थेट फटका ग्रामिण विद्यार्थ्यांना बसत आहे .
कोविडनंतर झालेले शैक्षणिक नुकसान अद्याप भरून निघालेले नाही . त्यातच शाळा बंद , शिक्षकांची कमतरता आणि वाढता ताण यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर परिणाम होत आहे . “बिचारे मराठी शिक्षक काय करणार आणि गरीब ग्रामीण विद्यार्थ्यांचे काय होणार?” असा सवाल आता खुलेपणाने उपस्थित केला जात आहे . शिक्षकां वर वाढता मानसिक व शारीरिक ताणही गंभीर बाब ठरत आहे . अति कामाच्या ओझ्यामुळे शिक्षकांचे आरोग्य धोक्यात येत असुन त्याचा परिणाम अध्याप नावर होत आहे .
ग्रामीण भागातील शिक्षकांना विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी स्वतंत्र वेळ देण्याची नितांत गरज असतांना शासना कडुन मात्र त्यांना सतत शाळा बाह्य कामांत गुंतवले जात असल्याचा आरोप होत आहे . या संपुर्ण प्रकरणाची माहिती नागपुर महानगर पालिकेचे आयुक्त तथा निवडणुक अधिकारी , जिल्हा धिकारी नागपुर आणि शिक्षणाधिकारी जि.प नागपुर यांना देण्यात आली आहे . शिक्षक भरती तातडीने करावी , निवडणुक काळात पर्यायी व्यवस्था उभारावी आणि शिक्षण बाह्य कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी , अशी जोरदार मागणी शिक्षक , पालक व सामाजिक संघटनां कडुन होत आहे . अन्यथा ग्रामीण मराठी शिक्षण व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या