निरंतर कार्यरत असलेली शिक्षक संघटना म्हणजे शिक्षक परिषद - मिनानाथ सातपुते
शिक्षकांच्या हक्कासाठी चोवीस तास सज्ज ; कन्हान अधिवेशनात शिक्षक परिषदेचा आक्रमक सूर
कन्हान : - महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपुर ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हा अधिवेशन रविवार (दि.१८) जानेवारी रोजी डोणेकर सभागृह कन्हान येथे पार पडले . या अधिवेशनाचे उद्घाटन वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल , कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद , जिल्हाध्यक्ष मीनानाथ सातपुते यांच्या हस्ते भारतमाता आणि सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पुजन पुष्प हार अर्पण करुन करण्यात आले . यावेळी कन्हान - पिपरी नगरपरिषद नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , उपाध्यक्ष रिकेंश चवरे , माजी उपाध्यक्ष शरद डोणेकर , माजी शिक्षक आमदार नागो गाणार , राज्य महिला आघाडी प्रमुख सौ. पूजा चौधरी , नागपूर विभागीय अध्यक्ष अजय वानखेडे , कार्यवाह सुभाष गोतमारे , विभाग महिला आघाडी प्रमुख सौ.मनीषा कोलारकर , उपाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार , संघटनमंत्री रामदास गिरटकर , नागपूर शहर अध्यक्ष राजेंद्र पटले , नागपूर विभागाचे कार्यालयीन मंत्री सुधीर वारकर , कार्यवाह प्रमोद बोढे , कोषाध्यक्ष सुनील शेळके , शहर महिला प्रमुख डिंपी बजाज , स्वीकृत नगरसेविका सुनंदा दिवटे , विनायक इंगळे गुरुजी यांचा सह आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते .
दिवसेंदिवस शिक्षकांच्या समस्या वाढत असून त्या सोडविण्यासाठी शिक्षक परिषद ही संघटना सातत्याने व निरंतर लढा देत आहे . शिक्षकांच्या हक्काच्या लढ्यासाठी माजी शिक्षक आमदार नागो गाणार हे चोवीस तास सज्ज असून ते सदैव आघाडीवर असतात , असे प्रतिपादन शिक्षक परिषदेचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मिनानाथ सातपुते यांनी केले .
सातपुते म्हणाले की , अनेक शिक्षक संघटना कार्यरत असल्या तरी त्यांच्याकडे स्वतंत्र कार्यालय नाही . मात्र शिक्षक परिषदेचे स्वतंत्र कार्यालय असल्याने समस्याग्रस्त शिक्षक थेट संपर्क साधू शकतात . शासनाने शिक्षकविरोधी निर्णय व परिपत्रके काढल्यास त्याविरोधात सर्वप्रथम आवाज उठविण्याचे काम शिक्षक परिषद करते , त्यानंतर इतर संघटना जागृत होतात , असा टोलाही त्यांनी लगावला . शिक्षकांवर लादण्यात आलेली अनावश्यक व बेकायदेशीर ऑनलाईन कामे तात्काळ बंद झाली पाहिजेत , अशी मागणी करत शिक्षणाधिकारी कार्यालयातील संथ कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली . यापूर्वी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अधिकारी तुरुंगात जाऊनही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही .
आजही पैसे दिल्याशिवाय कामे होत नसल्याचे चित्र असून , वेळ पडल्यास अशा प्रवृत्तीविरुद्ध शिक्षक परिषद गप्प बसणार नाही , असा इशाराही त्यांनी दिला . अनुकंपा तत्त्वावर नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी फाईल्स वर्षानुवर्षे प्रलंबित असून त्यांचा निपटारा होत नसणे ही शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले . या व इतर प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच शिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले .
माजी आमदार नागो गाणार यांनी सांगितले की , १३ फेब्रुवारी २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी लागू होणार नाही . १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांनाच टीईटी बंधनकारक आहे . शिक्षक समाज व देश घडविण्याचे काम करतो , त्यामुळे तो सदैव आनंदी असणे आवश्यक आहे . शिक्षकांना अशैक्षणिक व ऑनलाईन कामे देऊ नयेत , अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली . कार्यक्रमात इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाची प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह राजीव तांदुळकर यांनी केले , सूत्रसंचालन सौ.भाग्यश्री नखाते यांनी केले आणि आभार हेमराज फाटे यांनी मानले .
अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी पारशिवणी तालुकाध्यक्ष प्रवीणकुमार साबळे , कार्यवाह अमित मेंघरे , कोषाध्यक्ष सुनील लाडेकर , सौ. कल्पना सुरदुसे , प्रशांत वैद्य , भुणेश्वर बोबडे , निसर्ग पवार , धनंजय जिचकार , नितीन आष्टणकर , सुदर्शन अंगडलवार , शंकर गोमासे , भोजराज सोनसरे , सौ.सारिका गाणार यांच्यासह शिक्षक परिषदेच्या पारशिवणी तालुका पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या