पालकांमध्ये हेल्मेट जनजागृतीसाठी धर्मराज प्राथमिक शाळेचा पुढाकार
पोलीस कारवाईपेक्षा जीवाची भीती महत्त्वाची - अश्विनी बजाज
१४४ पालकांना मोफत हेल्मेट संचांचे वाटप
कन्हान : - रस्ते अपघातांमध्ये सुरक्षेअभावी मृत्यूचे प्रमाण वाढत आहे . अनेकजण केवळ पोलीस कारवाईच्या भीतीने निकृष्ट दर्जाचे हेल्मेट वापरतात . मात्र कारवाईपेक्षा जीवाची भीती ठेवून दर्जेदार हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे , असे प्रतिपादन प्रभाव फाऊंडेशनचे समन्वयक अश्विनी बजाज यांनी केले .
धर्मराज प्राथमिक शाळेत आयोजित मोफत हेल्मेट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते . धर्मराज प्राथमिक शाळेला ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच संस्थेचे अध्यक्ष खुशालराव पाहुणे यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी एकुण १४४ पालकांना हेल्मेट संचांचे मोफत वाटप करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मराज शैक्षणिक संस्थेचे संचालक खुशालराव पाहुणे होते . प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील प्रभाव फाऊंडेशनचे समन्वयक अश्विनी बजाज , महाराष्ट्र राज्य समन्वयक सुनीता बजाज , शिक्षक नेते मिलिंद वानखेडे , कार्यक्रमाचे आयोजक व मुख्याध्यापक खिमेश बढिये , पालक प्रतिनिधी विधिलाल डहारे , माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश डुकरे उपस्थित होते .
पालकांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात असल्याचे मुख्याध्यापक बढिये यांनी सांगितले . प्रभाव फाऊंडेशनच्या माध्यमातून ही मदत मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले . कार्यक्रमाचे संचालन गणेश खोब्रागडे यांनी केले , तर आभार भिमराव शिंदेमेश्राम यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चित्रलेखा धानफोले , किशोर जिभकाटे , गणेश खोब्रागडे , अर्पणा बावनकुळे , भिमराव शिंदेमेश्राम , राजू भस्मे , प्रिती सुरजबंसी , पालक प्रतिनिधी रोशन भोयर , जितेंद्र मदनकर , रोशन बोरकर तसेच परिवहन समिती सदस्य मुकुंद उंबजकर यांनी सहकार्य केले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या