अंदाजपत्रकानुसारच डांबरीकरण करा ; अन्यथा आंदोलनाचा इशारा
कन्हान : - कन्हान - पिपरी नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रीय महामार्ग ते कुरडकर मार्गावरील डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम मंजूर अंदाजपत्रक व शासकीय नियमांनुसारच करण्यात यावे , अशी मागणी माजी नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली . या मागणीसाठी नागरिकांनी मुख्याधिकारी दिपक घोडके यांना निवेदन सादर केले .
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की , पायाभूत सुविधा योजने अंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सदर रस्ता बांधकामाचे अंदाजपत्रक मंजूर असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे . कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आला आहे . मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अतिक्रमणामुळे आणि ते नियमानुसार हटविण्यास झालेल्या विलंबामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास उशीर झाला .
सध्या परिस्थिती अनुकूल असून बहुतांश दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण हटविले आहे . त्यामुळे रस्ता बांधकामास कोणतीही अडचण राहिलेली नाही , असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे . त्यामुळे आता काम सुरू करतांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत रस्त्याची लांबी व रुंदी मंजूर अंदाजपत्रकानुसारच ठेवावी , अशी मागणी करण्यात आली.
भविष्यात नागरिकांच्या वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होऊ नये , याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. जर बांधकाम करताना अंदाजपत्रक किंवा शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले , तर नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला
.या प्रसंगी नगरसेविका रेखा टोहणे , प्रशांत मसार , भरत पगारे , शैलेश दिवे , सम्राट पगारे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या