शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी बीआरएसपीची जनसुनावणीत तक्रार
कन्हान : - पारशिवनी तहसील कार्यालयात आयोजित जनसुनावणीत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी) च्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत जिल्हाधिकारी मा. विपिन इटनकर यांच्याकडे तक्रार निवेदन सादर करण्यात आले .
ही जनसुनावणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या निर्देशानुसार घेण्यात आली होती . रामटेक विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बीआरएसपी सातत्याने लढा देत असून , त्याचाच एक भाग म्हणून पक्षाने यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या . युरिया खत वितरण करतांना काही कृषी केंद्रांवर लिंकिंगच्या नावाखाली नॅनो युरिया प्लसची सक्ती केली जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले . नॅनो युरिया घेण्यास नकार दिल्यास बिलामध्ये हेराफेरी करणे किंवा ‘युरिया उपलब्ध नाही’ असे स्पष्ट सांगितले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या . अशा प्रकारांवर तातडीने प्रतिबंध घालावा , अशी मागणी करण्यात आली .
प्रत्येक कृषी दुकानात उपलब्ध खतसाठ्याचे विवरण दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करावे , तसेच नॅनो युरियाच्या बाटलीवर नमूद असलेल्या “मुफ्त दुर्घटना विमा” बाबत स्पष्टता देण्यात यावी , अशी ही मागणी करण्यात आली . तालुक्यात ऑनलाईन धान खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी , बोनस फॉर्म ई - सेवा केंद्रांवर उपलब्ध करून द्यावेत , शासनाकडून मिळणारा धान पीक बोनस २० हजार रुपये प्रति हेक्टरऐवजी ४० हजार रुपये करावा , तसेच गावागावात सुरू असलेली अवैध धान्य खरेदी तातडीने बंद करावी , अशा विविध मागण्यांचा समावेश निवेदनात होता .
यावर जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी कृषी अधीक्षकांना तात्काळ योग्य कारवाईचे निर्देश दिले . कृषी अधीक्षकांनी बीआरएसपीच्या शिष्टमंडळाला योग्य कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल , असे आश्वासन दिले .
यावेळी रामटेक विधानसभा प्रमुख शांताराम जळते , टेकाडी सर्कल प्रमुख राज गुरधे पाटील , समन्वयक हरिश भेलावे , भगवान यादव , शेतकरी संघटनेचे देवचंद कुंभळकर , सुरेश मेश्राम , कन्हान शहर प्रमुख प्रविण सतदेवे , महिला प्रमुख निर्मला मरकामज्ञ, शाहीर जयराम सोनेकर , रमेश शेंदरे , गज्जू बोरधारे आदी उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या