Advertisement

पोलीस रेजिंग डे सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांसाठी जनजागृती


पोलीस रेजिंग डे सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांसाठी जनजागृती


वच्छालागोपी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना कन्हान पोलीस ठाण्यात शस्त्र व कायद्याचे धडे


कन्हान : - महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त २ ते ७ जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या पोलीस रेजिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने कन्हान पोलीस ठाण्याच्या वतीने विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत . या सप्ताहाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे , पोलीस दलाची कार्यपद्धती समजावून सांगणे तसेच पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे हा आहे .

या पार्श्वभूमीवर वच्छालागोपी पब्लिक स्कूल , कन्हान येथील विद्यार्थ्यांना कन्हान पोलीस ठाण्यात बोलावून विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . ग्रामीण भागात कार्यरत असतानाही या शाळेने सीबीएसई बोर्डच्या शिक्षणात अल्प कालावधीतच उल्लेखनीय प्रगती साधली असून , शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी शाळा म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे .

५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस दलाचे कामकाज प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितले . पोलीस स्टेशनची रचना , स्टेशन डायरीचे महत्त्व , विविध टेबलांवरील कामकाज , कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या , जेलखान्याची माहिती , गुन्हेगारी तपासाची प्रक्रिया , चोर व संशयित यातील फरक याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .

यासोबतच पोलिसांकडे उपलब्ध असलेली शस्त्रास्त्रे , शस्त्रसाठा , दंगल नियंत्रणासाठी वापरण्यात येणारी साधने , पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी असलेली आधुनिक उपकरणे , शस्त्र वापराचे नियम व त्यामागील कायदेशीर बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या . विद्यार्थ्यांसह उपस्थित शिक्षकांनाही पोलीस दलाची सामाजिक जबाबदारी , नागरिकांनी पोलिसांना कसे सहकार्य करावे आणि कायद्याचे पालन का महत्त्वाचे आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले . हा कार्यक्रम पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला .


 यावेळी एपीआय रोशन बावनकर , पीएसआय प्रवीण हारगुडे, पीएस आय एकनाथ राठोड , सुनील कामडी , मोहन शेळके , जैलाल सहारे यांनी शस्त्रांची माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच मालखाना अधिकारी विना धुल , नरेश बाटवारई , अनिल यादव , अक्षय शिंदे मोरे , आतिश मानवटकर , आकाश शिरसाट , अनिल खान आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते . 


या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील बीना सिंग , त्रिवेणी सरोदे , अर्चना काठोके , प्रीती पटले , दीपशिखा सिंग , पौर्णिमा राप्तीवर , दीक्षा चुटे , ट्विंकल यादव , दिव्या लेकुरवाळे , राजश्री चिंचुळकर , प्रमोद गवई व अनिकेत नानोटे यांनी सहकार्य केले . तसेच पत्रकार सुनील सरोदे , कमल यादव व ऋषभ बावनकर उपस्थित होते .


पोलीस रेजिंग डे सप्ताहाअंतर्गत २ जानेवारीपासून विविध उपक्रम राबविण्यात येत असून , तारसा रोड चौक येथे पोलीस बँड पथकाचे संचालन करण्यात आले . तसेच साईबाबा आश्रम हायस्कूल , टेकाडी येथे विद्यार्थ्यांना वाहतूक नियम , मोबाईलचे दुष्परिणाम , तसेच ‘गुड टच–बॅड टच’ बाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे . याचबरोबर वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे .

पोलीस रेजिंग डे सप्ताहातील या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याची जाणीव वाढत असून , पोलीस व सामान्य नागरिक यांच्यातील संवाद व विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या