महिला सन्मानाचे प्रेरणादायी उदाहरण
जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांची संवेदनशीलता
कन्हान : - महिला सन्मान , मातृत्वाचा आदर आणि लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणारा प्रेरणादायी प्रसंग मंगळवार (दि.१३) जानेवारी रोजी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात अनुभवास आला . जिल्हाधिकारी मा.श्री. विपिनजी इटनकर यांनी आपल्या संवेदनशील व मानवतावादी भूमिकेतून समाजासमोर एक आदर्श उदाहरण सादर केले . कांद्री नगरपंचायत , प्रभाग क्रमांक ६ येथून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सौ. शुभांगी पवन कुंभलकर यांना गट स्थापनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय , नागपूर येथे बोलावण्यात आले होते.
विशेष बाब म्हणजे , त्यांच्या प्रसूतीला अवघा एक आठवडा झाला असतानाही , जनतेने दिलेल्या विश्वासाला आणि लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या जबाबदारीला प्राधान्य देत त्या आपल्या केवळ सहा दिवसांच्या बाळासह कार्यालयात उपस्थित राहिल्या . ही परिस्थिती लक्षात येताच जिल्हाधिकारी मा. श्री. विपिनजी इटनकर यांनी तत्काळ संवेदनशीलता दाखवत स्वतः आपल्या केबिनमधून बाहेर येऊन सौ.शुभांगी कुंभलकर यांचे आवश्यक हस्ताक्षर घेतले . त्यामुळे प्रसूतीनंतरच्या महिलेला अनावश्यक त्रास होऊ नये , याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात आली . हा प्रसंग केवळ प्रशासकीय कामकाजापुरता मर्यादित न राहता , महिला सन्मान, मातृत्वाचा आदर आणि लोकशाहीतील लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यभावनेचे प्रतीक ठरला आहे . लोकसेवा आणि प्रशासन यांच्यातील मानवी संवेदनशीलतेचा हा दुर्मिळ संगम असल्याची भावना यावेळी उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती .
जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांची ही भूमिका प्रशासनातील मानवी दृष्टिकोन अधोरेखित करणारी ठरली , तर सौ.शुभांगी पवन कुंभलकर यांची लोकप्रतिनिधी म्हणून दाखवलेली निष्ठा व कर्तव्यभावना समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या