शहीद व महापुरुषांच्या नावाने लावले दिवे, वाहिली श्रद्धांजली
कन्हान शहर विकास मंच, कन्हान युथ फाउंडेशन व सकल हिंदू समाजचा उपक्रम
कन्हान : - दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देशासाठी बलिदान दिलेल्या शूर वीरांना व महान महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी “एक दिया शहीदों और महापुरुषों के नाम” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम कन्हान शहर विकास मंच, कन्हान युथ फाउंडेशन व सकल हिंदू समाज कन्हान क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने तारसा रोड येथील शहीद चौक येथे बुधवारी (दि. २३ ऑक्टोबर) पार पडला.
कार्यक्रमाची सुरूवात वीर सुपुत्र शहीद प्रकाश देशमुख यांच्या प्रतिमेला तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी शहीद प्रकाश देशमुख यांची आई लीलाबाई देशमुख, प्रदीप देशमुख, मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे, कैप्टन सतीश बेलसरे, माजी सैनिक विशाल देऊळकर, श्रवण चव्हान व अमित राऊत आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
यानंतर उपस्थित नागरिकांनी आणि संस्थेच्या सदस्यांनी शहीद आणि महापुरुषांच्या नावाने दिवे लावून मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन केले. जेष्ठ नागरिक भरत सावळे, शिक्षक हरिष पोटभरे, विशाल देऊळकर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळते आणि देशभक्तीची ज्योत प्रज्वलित राहते.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषभ बावनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर दारोडे यांनी केले. कार्यक्रमात उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आले आणि सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
---
“शहीदांच्या नावाने दिवा लावणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य” — कैप्टन सतीश बेलसरे
“अमर शहीदांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित आहोत आणि आपल्या घरात दिवे लावू शकतो. म्हणूनच शहीदांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, स्मारकांना भेट देणे आणि त्यांच्या नावाने दिवा लावणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन कन्हान युथ फाउंडेशनचे संयोजक कैप्टन सतीश बेलसरे यांनी केले.
ते पुढे म्हणाले, “शूर सैनिकांनी केवळ सीमांचे रक्षण केले नाही, तर देशातील दहशतवादाचे उच्चाटन आणि चीनसारख्या आव्हानांचा सामना करण्याचे कामही केले. आपण त्या वीर शहीदांमुळेच जिवंत आहोत — त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सलाम.”
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर



0 टिप्पण्या