कन्हान नदी काठावर चार दिवसीय छठ पूजा महोत्सव थाटात साजरा
उगवत्या सूर्याला जल अर्पण करून भक्तांनी घेतला संकल्प
कन्हान – कन्हान शहरातील जुनी कामठी गाडेघाट रोडवरील राणी बगीचा परिसरात आणि आडापुल साई मंदिरामागील कन्हान नदीकाठावर उत्तर भारतीय बांधवांनी पारंपरिक पद्धतीने छठ पूजा महोत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साहात साजरा केला. चार दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्याचा समारोप उगवत्या सूर्याला जल अर्पण करून करण्यात आला.
शनिवार (दि.२५ ऑक्टोबर) रोजी ‘नहाय-खाय’ या पहिल्या दिवशी महिलांनी नदीत स्नान करून विधिवत पूजा-अर्चना करत छठ महोत्सवाची सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी ‘खरना’ दिवशी उपासकांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत निर्जला उपवास केला. सूर्यास्तानंतर अन्न तयार करून सूर्यदेवाला नैवेद्य अर्पण करण्यात आला.तिसऱ्या दिवशी संध्याकाळी महिलांनी बांबूच्या टोपल्यांत फळे, थेकुआ, तांदळाचे लाडू घेऊन मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केले. चौथ्या दिवशी पहाटे उगवत्या सूर्याला जल अर्पण करून छठ पूजेची सांगता करण्यात आली. या वेळी ‘जय सूर्यदेव’च्या जयघोषात नदी परिसर दुमदुमला होता.![]() |
| छट पूजा |
प्रशासनाचा चोख बंदोबस्त
छठ पूजेच्या निमित्ताने कन्हान-पिपरी नगर परिषद व नगरपंचायत कांद्री यांनी वीज , पाणी , पार्किंग , स्वच्छता आदींची प्रभावी व्यवस्था केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या नेतृत्वात पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला .
नदी परिसरात स्वच्छतेचा संदेश
छठ पूजा महोत्सव संपल्यानंतर कन्हान युथ फाउंडेशन आणि कन्हान शहर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने नदी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यकर्त्यांनी ‘स्वच्छ कन्हान – प्लास्टिकमुक्त कन्हान’ या संदेशाने प्लास्टिक, जलपर्णी, केळीच्या साली आणि इतर कचरा गोळा करून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली. नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्यात आली.“स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाचीच” – कैप्टन सतीश बेलसरे
“कचरा कमी करणे आणि तो योग्य ठिकाणी टाकणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते आणि प्रदूषण कमी होते. पुनर्वापर उपक्रम राबवून आणि प्लास्टिकचा वापर कमी करून आपण संसाधनांचे जतन करू शकतो,” असे मत कैप्टन सतीश बेलसरे यांनी व्यक्त केले . यावेळी कैप्टन सतीश बेलसरे, शैलेश झेंडे, सूर्यभान फरकाडे, प्रकाश तिवारी, चंदन सिंग, शिवाजी देवनाथ, सूरज वरखडे, ऋषभ बावनकर, राकेश भरणे, आयुष संतापे, आर्यन संतापे, सुर्या संपाते, अनिकेत संतापे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Chhath Puja festival | कन्हान नदी काठावर चार दिवसीय छठ पूजा महोत्सव थाटात साजरा
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर




0 टिप्पण्या