Advertisement

आम आदमी पार्टीची सावनेरमध्ये मोठी घोषणा


आम आदमी पार्टीची सावनेरमध्ये मोठी घोषणा

सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार; नगराध्यक्षपदासाठी ४ महिलांची नावे चर्चेत, 'आप'ने जाहीर केला ९ कलमी विकास संकल्प


सावनेर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर आम आदमी पार्टी (आप) ने सावनेरच्या राजकारणात धडाकेबाज एन्ट्रीची घोषणा केली आहे. १५ ऑक्टोबर रोजी कामाक्षी सेलिब्रेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाने येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या सर्व निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्णय जाहीर केला.

यावेळी पक्षाचे महाराष्ट्र संघटन मंत्री श्री. भूषण ढाकुलकर, प्रदेश सचिव श्री. सुनील वडसकर व श्री. शाहीदअली जाफरी यांच्यासह जिल्हाध्यक्ष श्री. वृषभ वानखेडे, तालुका अध्यक्ष श्री. पंकज घाटोडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक

पक्षाच्या नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले की, सावनेर तालुका अध्यक्ष श्री. पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वाखाली 'आप' सर्व निवडणुका लढणार असून, प्रामाणिक आणि पारदर्शक प्रशासनाचा दिल्ली पॅटर्न सावनेरमध्ये राबवण्याचा संकल्प आहे.

नगराध्यक्ष पदासाठी ४ महिलांच्या नावांची चर्चा

सावनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आम आदमी पार्टीने महिला नेतृत्वाला संधी देण्याचा मानस व्यक्त केला आहे. सध्या सौ. अनीता रमेश धानवले, सौ. प्रमिला संजयजी तेंभेकर, सौ. ज्योती कालिदास बुधोलिया आणि सौ. अश्विनी पंकज घाटोडे या चार महिलांची नावे चर्चेत असल्याचे पक्षाने घोषित केले. पक्षाच्या कार्यकारिणीने सांगितले की, अंतिम उमेदवाराची निवड सखोल पडताळणीनंतर लवकरच जाहीर केली जाईल.

सावनेरच्या विकासासाठी ९ कलमी जाहीरनामा

पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीने सावनेर शहर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी खालीलप्रमाणे ९ महत्त्वाचे मुद्दे जाहीर केले:

 * वीज आणि पाणी: सावनेरकरांसाठी सोलार प्रकल्पाची निर्मिती, ज्यामुळे वीज बिलाचा भार कमी होईल. जुन्या पाण्याच्या टाक्यांचे नुतनीकरण आणि आधुनिक वॉटर फिल्टर प्लांटची स्थापना.

 * शिक्षण आणि वाचनालय: नगर परिषदेच्या शाळांचे आधुनिकीकरण, इन्फ्रास्ट्रक्चर आणि खेळाच्या मैदानांचे उन्नतीकरण. स्पर्धा परीक्षार्थींसाठी संगणकासह आधुनिक वाचनालय आणि वयोवृद्धांसाठी कादंबरी वाचनाची सुविधा.

 * रोजगार आणि समाज कल्याण: युवकांसाठी रोजगार शिबिरे, तसेच बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी स्थानिक मॉलची स्थापना. ६० वर्षांवरील नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे.

 * पायाभूत सुविधा: नगर परिषदेच्या माध्यमातून नवे कॉम्प्लेक्स व रोजगार निर्मिती उपक्रम सुरू करणे. शहरातील रस्ते, नाले, बागा, खेळाचे मैदाने यांचे सौंदर्यीकरण व नुतनीकरण करणे.

आम आदमी पार्टी सावनेरचा विकास आणि पारदर्शक स्थानिक प्रशासन यासाठी कटिबद्ध असून, नागरिकांनी सहभाग घेऊन या 'आप'च्या संकल्पाला बळ द्यावे, असे आवाहन पक्ष पदाधिकाऱ्यांनी केले.

Aam Aadmi Party's big announcement in Saoner

पुढाकार/ प्रतिनिधी: अशोक काळबांडे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या