Advertisement

चारचाकी वाहनाच्या धडकेत ३५ वर्षीय इसमाचा मृत्यु



चारचाकी वाहनाच्या धडकेत ३५ वर्षीय इसमाचा मृत्यु

महामार्गावर तणावाचे वातावरण ; आरोपी चालक अटक

कन्हान : - नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाघोली शिवारात नॅनो चारचाकी वाहनाच्या धडकेत ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १९ ऑक्टोबर) सकाळी घडली . या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले . मृतकाचे नाव किशोर हरिभाऊ उमाळे (३५, रा. वाघोली) असे असून तो शेतीमजुरीचे काम करत होता.


रविवारी सकाळी पाच वाजता च्या दरम्यान किशोर मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडला. एम.जे.के. फूड कंपनी जवळील शेतात फेरफटका मारून परतत असताना कंपनीजवळून जातांना नॅनो (क्र. एमएच-३५ पी-३६०२) या चारचाकी वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून किशोर याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तो रस्त्यावर बराच अंतर घसरत गेला . डोक्याला व पोटावर गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला . दरम्यान अपघाताची माहिती निखिल सोमेश्वर उमाळे (३०, रा. वाघोली) यांना दूरध्वनीवरून मिळताच ते आणि नातेवाईक घटनास्थळी पोहचुन घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली . पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय , कामठी येथे पाठवला. या प्रकरणी निखिल उमाळे यांच्या तक्रारीवरून आरोपी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी वाहन चालकाला अटक केली आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर करीत आहे .

महामार्गावर नागरिकांचा संताप ; वाहतूक विस्कळीत


अपघाताची बातमी वाघोली व वराडा गावात पसरताच शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी संतापाच्या भरात चारचाकी वाहन पलटवून तोडफोड केली . काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या . दरम्यान कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांना समजवून शांत केले . वाहतूक पोलीसांच्या प्रयत्नानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या