Advertisement

अवैध गोवंश वाहतूक करणारा ट्रक पकडला; ३१ गोवंशाचे प्राण वाचवले, ८ गोवंशांचा मृत्यू

अवैध गोवंश वाहतूक करणारा ट्रक पकडला; ३१ गोवंशाचे प्राण वाचवले, ८ गोवंशांचा मृत्यू


दोन आरोपी अटक, ट्रकसह एकूण २४ लाखांचा मुद्देमाल जप्त


स्थानिक गुन्हे शाखेची कन्हान परिसरात मोठी कारवाई


कन्हान : – नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कन्हान परिसरात मोठी कारवाई करत अवैध गोवंश वाहतूक करणारा ट्रक पकडला. या कारवाईत ३१ गोवंशांना जीवनदान मिळाले, तर ८ गोवंशांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत ट्रकसह एकूण २४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


सोमवार (दि. ३ मार्च) रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कन्हान उपविभागात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, जबलपूर रोडवरून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या १२-चाकी ट्रकमध्ये (क्रमांक MH-34-AB-6629) अवैधपणे गोवंश कत्तलीसाठी नेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नागपूर-जबलपूर बायपास रोडवरील कुंभलकर ढाब्यासमोर नाकाबंदी लावली.


काही वेळातच संशयित ट्रक पोलिसांना दिसला. पोलिसांनी ट्रकला थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने ट्रक थांबवले. वाहनाची तपासणी केली असता, ट्रकच्या मागील डब्यात निर्दयपणे ३९ गोवंश कोंबून ठेवलेले आढळले. त्यापैकी ८ गोवंश मृत अवस्थेत होते. आरोपींनी गोवंश वाहतुकीसाठी कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.


पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून ३१ गोवंश (मूल्य ४.६५ लाख रुपये) व १२-चाकी ट्रक (मूल्य २० लाख रुपये) असा एकूण २४.६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाचवलेले गोवंश पुढील देखरेखीसाठी देवलापार येथील गो विज्ञान अनुसंधान केंद्रात हलवण्यात आले. तसेच मृत गोवंशांचे शवविच्छेदन करून अहवाल मिळवण्याची तजवीज करण्यात आली आहे.


या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद काळे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीस ठाण्यात आरोपी इस्तेखार खान गुलाब खान आणि शेख जावेद शेख जफर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


ही कारवाई नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेळकी, उपनिरीक्षक विनोद काळे, पोहवा किशोर वानखेडे, प्रमोद भोयर, नापोशि संजय बदोरिया, पोशि आशुतोष लांजेवार व इतर कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


मागील काही दिवसांपासून देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतून मोठ्या प्रमाणात अवैध गोवंश तस्करी होत असल्याचे बोलले जात आहे. नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या घटनांना गांभीर्याने घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नागपूर-जबलपूर महामार्गावरून सुरू असलेल्या या तस्करीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे.


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या