कन्हानमध्ये प्रशासनाचा कठोर बडगा: दुकानदारांचा रस्त्यावर लढा , तणाव शिगेला
कन्हान: कन्हान शहरातील अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या दुकानदारांवर आज नगर परिषद प्रशासनाने कठोर कारवाई केली. नोटीस देऊन पाच दिवसांची अल्प मुदत देऊन प्रशासनाने आज थेट कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे संतप्त दुकानदारांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. या घटनेमुळे कन्हान शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू आहे.
प्रशासनाच्या या कारवाईने केवळ दुकाने हटविली गेली नाहीत, तर कुटुंबांचे आधारस्तंभ उद्ध्वस्त झाले आहेत. शेकडो दुकानदारांनी प्रशासनाला घेराव घालत, किमान काही दिवसांची मुदत देण्याची विनंती केली. मात्र, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची चर्चा टाळून थेट कारवाई सुरू ठेवल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या कारवाईमुळे अनेक दुकानदार अक्षरशः उघड्यावर आले आहेत. दुकानांवर अवलंबून असलेली शेकडो कुटुंबे अन्नाच्या वासनेने रस्त्यावर आली आहेत. "रोजगारच नाही, तर आम्ही जगायचे कसे?" असा सवाल करत कन्हानमधील व्यापारी व कुटुंबे अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत.
दुकानदारांच्या मते, प्रशासनाने त्यांच्या समस्यांकडे कानाडोळा करत, न्याय मिळवून देण्याऐवजी कठोर पाऊल उचलले आहे. "नोटीस बजावून केवळ पाच दिवसांत दुकान हटविणे शक्य आहे का?" असा सवाल संतप्त व्यापारी विचारत आहेत. नगर परिषदेच्या अशा कठोर भूमिकेमुळे नागरिकांमध्येही संताप पसरला आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तरीही दुकानदारांनी ‘आम्ही हटणार नाही’ असा निर्धार व्यक्त केला आहे. काही तासांच्या या संघर्षाने कन्हानमधील वातावरण अधिक तणावपूर्ण बनले आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि आमदार व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. "दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी सरकार काय करणार? बेरोजगारांना नवा रोजगार कोण देणार?" असे जळजळीत प्रश्न उपस्थित होत आहेत.
सामान्य जनतेने या दुकानदारांना पाठिंबा दर्शवत प्रशासनाच्या कारवाईवर कडाडून टीका केली आहे. "हे सरकारी बुलडोझर केवळ गरीबांच्या संसारांवरच चालतात का?" असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दुकानदारांचा लढा आता केवळ रस्त्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. या लढ्याने संपूर्ण कन्हान शहराला एकत्र आणले आहे. प्रशासनाला याची जाणीव करून देण्यासाठी व्यापाऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या