Advertisement

धक्कादायक! खदान परिसरात सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला


धक्कादायक! खदान परिसरात सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला 

वाहन जाळून हल्लेखोर पसार , पोलीसात गुन्हा दाखल , 

कन्हान : - कन्हान परिसरातील डब्ल्यूसीएल इंदर कामठी डीप ओपन कास्ट माईन मध्ये एमएसएफ सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला . गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे वाहन पेटवून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले . या घटनेने खाण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून डब्ल्यूसीएलच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार (दि.७) जानेवारी ला रात्री ८ वाजता च्या दरम्यान एमएसएफ सुरक्षा कर्मचारी प्रशांत सुधाकर सोनारे, प्रवीण ठाकरे, विलास मापारी आणि वाहनचालक आशीष मेश्राम हे महिंद्रा बोलेरो कॅम्पर (MH40 CM 3339) वाहनाने खाण परिसरात गस्तीवर होते . त्यांच्या ताफ्यात दोन 12-बोअर रायफल्स आणि 20 जिवंत राऊंड होते . गस्ती दरम्यान आर.के वर्कशॉप जवळ एका अज्ञात व्यक्तीने वाहन थांबवण्याचा इशारा केला . वाहन थांबताच अचानक तलवारीसह दोन हल्लेखोर मातीच्या ढिगाऱ्यातून उडी मारून बाहेर आले आणि त्यांनी हल्ला सुरू केला .


एका हल्लेखोराने वाहनाची चावी काढून घेतली , तर इतरांनी कर्मचाऱ्यांवर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला . ड्रायव्हर आशीष मेश्राम आणि कर्मचारी विलास मापारी यांनी जीव वाचवण्यासाठी वर्कशॉप कडे धाव घेतली , तर प्रशांत सोनारे आणि प्रवीण ठाकरे वाहनाच्या मागील बाजूने पळाले . हल्लेखोरांनी वाहन पेटवले आणि खाण क्रमांक तीनच्या दिशेने पळून गेले .


घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस स्टेशन चे निरीक्षक राजेंद्र पाटील आणि त्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला . नागपूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या .


या प्रकरणी एमएसएफ कर्मचारी प्रशांत सोनारे यांच्या तक्रारीनुसार कन्हान पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहितेच्या कलम 109 (गुन्ह्यासाठी सहकार्य), 132 (सशस्त्र हल्ला), 326(F) (घातक हत्यारांनी हल्ला), आणि 3(5) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे . पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.


या घटनेने डब्ल्यूसीएलच्या खाण परिसरातील सुरक्षेतील त्रुटी उघड केल्या आहेत . मर्यादित संसाधने, अपुरे प्रशिक्षण, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


घटनेमुळे खाण परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे . स्थानिक प्रतिनिधींनी सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी केली आहे. डब्ल्यूसीएल व्यवस्थापनाने सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या जिवीत सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या