Advertisement

देशाच्या आर्थिक विकासात युवकांचा सहभाग महत्त्वाचा:डॉ.हरीश आडके

देशाच्या आर्थिक विकासात  युवकांचा सहभाग महत्त्वाचा: डॉ.हरीश आडके

सुरगाणा (नाशिक):- सुरगाणा  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर  खोकरी येथे आयोजित करण्यात आले आहे.  शिबिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. हरीश आडके यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी ते म्हणाले की, राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे .विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होणे गरजेचे आहे. आपल्या देशाच्या आर्थिक, सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडवण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका आहे. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होते. युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्व घडवण्याचे कार्य या योजनेद्वारे होते. तरुणांमध्ये श्रमप्रतिष्ठा, समाजसेवेची जाण यावेळी घडवली जाते. ग्रामीण भागातील परिस्थितीची जाण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेमुळे होते .देशाच्या आर्थिक विकासामध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची आहे.

भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. भारतातील युवकांकडे चांगले कौशल्य विकसित होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे ,असे केल्यास देश विकसित होईल. विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे .राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वरदान ठरली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .सी.जी. दिघावकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. एस. आर .पावडे यांनी केले.  सूत्रसंचालन के. के. भोये यांनी केले .आभार सागर पालवे यांनी मांडले .यावेळी खोकरी ग्रामपंचायतचे सरपंच काशिनाथ गवळी,प्रा. डी. एल. गुंजाळ ,देशमुख नाना, श्री. आर. टी. चौधरी, ग्रामपंचायतचे सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 

प्रतिनिधी – किशोर जाधव, सुरगाणा-नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या