राजमाता जिजाऊसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची शिकवण युवापिढीला मार्गदर्शक- डॉ. युवराज भामरे
सुरगाणा – नाशिक:- सुरगाणा महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून महाविद्यालयीन परिवाराच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मराठी विभागाचे डॉ. वाय. डी. भामरे यांनी आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून जाहीर केला. दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो.
स्वामी विवेकानंद यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणा देणारे आहे. त्यांनी युवकांमध्ये आत्मविश्वासाची ज्योत पेटवली. स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण जगासमोर मांडलेले आंतरिक चैतन्य शक्ती, धर्माचरण ,राष्ट्रवाद सारखे विचार हे जगभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी असून त्यांचे आचरण करणे हीच खरी त्यांच्यासाठी आदरांजली आहे. तसेच राजमाता जिजाऊ यांना राजमाता, राष्ट्रमाता म्हणून त्यांना संबोधले जाते. माता केवळ मयाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईंचं होतं. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडविले. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये त्यांनी निर्माण केला होता. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही. डी. अहिरे, शैक्षणिक सुपरवायझर प्रा. एस. एम. भोये, कार्यालयीन अधीक्षक श्री. आर. टी .चौधरी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
प्रतिनिधी – किशोर जाधव, सुरगाणा – नाशिक
0 टिप्पण्या