Advertisement

ग्राहकांच्या हक्कांना संरक्षण देणे गरजेचे -डॉ सुनील घुगे

ग्राहकांच्या हक्कांना संरक्षण देणे गरजेचे -डॉ सुनील घुगे

सुरगाणा: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे वाणिज्य विभागातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.जी. दिघावकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रमुख वक्ते प्रा डॉ. सुनील घुगे होते. ते म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहे. त्यामध्ये 1) सुरक्षेचा हक्क 2) माहितीचा हक्क 3) निवड करण्याचा अधिकार 4) म्हणणे मांडण्याचा हक्क 5) तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क आणि 6) ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार असे विविध हक्क मिळालेले आहेत. बाजारपेठेत ग्राहक हा राजा असतो .आजच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक हा बाजारपेठेत होणाऱ्या खरेदी विक्रीच्या व्यवसायाचा केंद्रबिंदू बनला आहे. ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्काबाबत सक्षम व्हावा याकरता विविध ग्राहक संघटना लोकांना जागरूक करीत आहेत. जागतिकीकरणानंतर मुक्त स्पर्धेच्या युगात ग्राहकांना दर्जेदार वस्तू कमी किमतीत मिळायला लागली आहे. बाजारात मुक्त स्पर्धा आवश्यक आहे.

ग्राहकांनी सुद्धा बाजारात खरेदी करताना जागरूक असणे आवश्यक आहे .ग्राहकांची जागरूकता फार महत्त्वाची आहे. ग्राहकांच्या हक्कांचा उपयोग करून ग्राहकित जोपासणारी व्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्राहक हा राजा होऊ शकेल .वाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो. त्यासाठी ग्राहकांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत. ग्राहक संरक्षण कायदा नागरिकांच्या फायद्याचेच आहेत मात्र सरकारची अंमलबजावणीसाठीची यंत्रणा सक्षम नाही. ती सक्षम करणे आवश्यक आहे. अनेकदा ग्राहकांना संरक्षण कायदेच माहिती नसतात .त्यामुळे सुद्धा अडचणी निर्माण होतात. देशातील ग्राहक न्यायालयांमध्ये हजारो खटले प्रलंबित आहेत. ते खटले सुद्धा लवकर मार्गी लावणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.वसंत गायकवाड यांनी केले. आभार प्रा. सुशील पवार यांनी मांडले. यावेळी उपप्राचार्य प्रा. व्ही. डी. अहिरे, शैक्षणिक सुपरवायझर प्रा. एस. एम. भोये, कार्यालयीन अधीक्षक श्री. आर. टी. चौधरी, प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिनिधी – किशोर जाधव, सुरगाणा/नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या