शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी येथे “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा
ब्रम्हपुरी: शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी संस्थेत भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दि. १५ ऑक्टोबर हा जन्मदिन म्हणजेच “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संस्थेचे प्राचार्य डॉ. ङी. एन. शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे उपप्राचार्य डॉ. अनिल पावडे यांनी स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शंनात डॉ. कलाम यांचे आत्मचरीत्र – “अग्नीपंख” वाचन करण्याचे आवाहन केले. डॉ. कलाम यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असून यशोशिखर गाठण्यासाठी सहायक ठरतो. त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा उपयोग कमी करुन पुस्तक वाचनाचा छंद जोपासावा असा मौलिक सल्लादेखील दिला.
त्यांनी स्वत: वाचलेल्या विविध पुस्तकांचा संदर्भ देऊन वाचन कसे आवश्यक आहे हे उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना सांगितले. सदर कार्यक्रमात विद्युत अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थींनी पुनम केळझरकर, प्रथम वर्षातील प्रतिक कामडी, उत्कर्षा रंगारी आणि नेहा जांभुळे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. कलाम यांचे विचार विद्यार्थ्यांना अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करुन यशस्वी होण्यासाठी कसे मार्गदर्शन करतात हे सांगितले. सहायक ग्रंथपाल कु. नयना खानोरकर यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथ वाचून व्यासंग वाढवावा असे आवाहन केले.
कार्यक्रमानंतर मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रदर्शन ग्रंथालयात आयोजित केले होते. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या दिनी ग्रंथालयात वाचन केले. सदर कार्यक्रमांच्या वेळी जिमखाना उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र राचलवार, विभागप्रमुख प्रा. दुलारी गाढवे, प्रा. आशिष देशमुख, प्रा. जयंत बोरकर, प्रा. शालिनी खरकाटे, प्रा. जानराव केसकर, डॉ. प्रशांत चौके तसेच बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार जिमखाना सहायक तथा संस्थेचे मराठी भाषा अधिकारी नितिन पोटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिमखाना सहायक प्रशांत मडावी, सुरेश गजभिये तसेच विद्यार्थी निकिता दोनाडकर आणि रोहणकर यांनी प्रयत्न केले



0 टिप्पण्या